तिरुअनंतपुरम : देशात सर्वाधिक साक्षर असलेलं राज्य अर्थात केरळमधून एक चांगली बातमी... यंदाच्या वर्षी शाळेत प्रवेश घेणाऱ्या जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपली जात आणि धर्म लिहिलेलाच नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध शाळांमध्ये प्रवेश घेताना १ लाख, २३ हजार ५३० विद्यार्थ्यांनी त्यांची जात आणि धर्म जाहीर करायला आणि नोंदवायला नकार दिलाय. विविध शाळांमध्ये पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे हे विद्यार्थी आहेत. 


जात किंवा धर्म जाहीर करण्याची आमची इच्छा नाही, असं सांगत एक लाखाच्यावर विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी 'जात' आणि 'धर्म' हा रकाना कोराच ठेवलाय. केरळचे शिक्षणमंत्री सी रवींद्रनाथ यांनी केरळच्या विधानसभेत ही माहिती दिलीय.


या निमित्तानं केरळमध्ये हा एक प्रकारचा विक्रमच झालाय. ही संख्या आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेताना जात किंवा धर्म लिहिणं बंधनकारक नाही.