बिहार : भारत सरकारतर्फे दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक नागरिकांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो. त्यानंतर आपआपल्या क्षेत्रात ठळक कामगिरी करणाऱ्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षीची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही नावे अशीही आहेत जी ऐकताच आपल्याला विश्वासही बसणार नाही की अशी मंडळी आपल्यामध्येच राहतात. आपल्यासारखेच सर्वसाधारण आयुष्य जगताना जग बदलण्याची भूमिका ही मंडळी निभावत असतात. बिहारमधल्या राजकुमारी देवी हे देखील यातीलच एक नाव आहे. 


'सायकल चाची'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील मुजफ्फर जिल्ह्यापासून साधारण 30 किलोमीटर दूर सरैया नावाचा भाग आहे. तिथल्या आनंदपूर गावात राजकुमारी देवी राहतात.  वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले. त्यांचे वडील शिक्षक होते. लहानपणी घरात लाडाचे वातावरण होते. लग्नाच्या नऊ वर्षांपर्यंत त्यांना बाळ नव्हते. त्यांचे पति अवधेश कुमार यांच्याकडे कोणती नोकरीही नव्हती. शेतात तंबाखूचे उत्पादन करणे हेच काय ते काम अवधेश करत असतं. त्यामध्ये इतकी कमाई नव्हती. त्यानंतर राजकुमारीने शेतीतून निघालेल्या पिकांपासून उत्पादन बनवण्यास सुरूवात केली. लोणचे, मुरंबा वैगेरे सारखे पदार्थ त्या बनवू लागल्या. पण आता हे पदार्थ विकणार कोण ? हा त्यांच्यासमोरचा प्रश्न होता. पण यासाठी त्यांनी जास्त वेळ न लावता सायकल घेऊन स्वत: च विक्रीला जाऊ लागल्या. पतीला काही हे मुळीच आवडणार नव्हतं. त्यांनी तसं राजकुमारी यांना बोलून देखील दाखवलं. पण त्यांच्याकडे पर्याय नव्हता आणि राजकुमारी आपल्या निर्णयावर ठाम होत्या. या कामामुळे त्या खूपच प्रसिद्ध झाल्या. लोक त्यांना 'सायकल चाची' म्हणून हाक मारू लागले. 


खूप चांगल्या पद्धतीने काम केले जाऊ शकते असा विचार राजकुमारी यांनी केला. म्हणून त्या पूसा कृषि विश्वविद्यालयात गेल्या. तिथे त्या अन्न प्रक्रिया विषय शिकल्या. शेतीमध्ये कशाप्रकारे चांगले उत्पादन आणले जाऊ शकते?  याबद्दल त्यांनी माहिती मिळवली. परत आल्यावर त्यांनी आजुबाजूच्या महिलांना देखील याबद्दल प्रशिक्षण दिले.  पपई आणि ओलचे उत्पादन त्यांनी घेतले. यानंतर त्या आणखी प्रसिद्ध झाल्या. 2003 मध्ये लालू यादव यांनी सरैया मेल येथे त्यांचा गौरव केला. नीतीश कुमारांचे सरकार आल्यानंतर त्यांनी देखील राजकुमारी यांच्या कामाची माहिती घेतली. 2007 मध्ये राजकुमारी यांना 'किसान श्री' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी 'आज की रात है जिंदगी' या कार्यक्रमात त्यांना बोलावले. शो नंतर पाच लाख रुपयांसोबतच पीठ चक्की आणि साड्या गिफ्टमध्ये मिळाल्या होत्या. 


राजकुमारी देवी यांनी गावच्या महिलांना सेल्फ हेल्प ग्रुप्स बनवण्यास प्रेरणा दिली. त्यांचे छोटे छोटे समूह असतात जे एकत्र मिळून उपजिविकेचे साधन शोधतात. कुटीर उद्योग चालवणे, लोकर घेणे-विकणे अशी सर्व कामे या समूहामार्फत केली जातात. राजकुमारी देवी यांना एकट्याला शेतीमध्ये काम करताना पाहणाऱ्या महिला आज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.