Kolkata Rape Case: `150 मिलीग्रॅम वीर्य` असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, `पीडितेच्या..`
Kolkata Rape And Murder Case Supreme Court Hearing: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान युक्तीवदामधील तो संदर्भ ऐकून सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
Kolkata Rape And Murder Case Supreme Court Hearing: देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जोरदार वादविवाद झाला. या प्रकरणासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना एका वकिलाने 150 मिलीग्रॅम सीमेनचा (वीर्याचा) उल्लेख केला असता सरन्यायाधीश संतापले. हे 150 मिलीग्रॅम सीमेनचं प्रकरण काय आहे? न्यायालयामध्ये आज नेमकं काय घडलं? सरन्यायाधीश काय म्हणाले? जाणून घेऊयात...
सरन्यायाधीशांनी सांगितलं हसू नका
सर्वोच्च न्यायालयामधील आजच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. एका क्षणी तर मेहतांनी सिब्बल यांना हसू नका असं सांगितलं. इथे एका मुलीने सर्वात अमानुष पद्धतीने प्राण गमावले आहेत, असं मेहता म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेजमधील तरुण महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. कामावर परतल्यानंतर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असा शब्द कोर्टाने या आंदोलनकर्त्या डॉक्टरांना दिला आहे.
30 वर्षांमध्ये असं कधीच पाहिलं नाही
या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने या प्रकरणात केलेली कारवाई मी माझ्या 30 वर्षांच्या कार्यकाळामध्ये कधीच पाहिली नाही, असं न्या. पारदीवाला म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना या प्रकरणामध्ये यूडी म्हणजेच अनैसर्गिक मृत्यूची घटना पहाटे 5.20 ला नोंदवण्यात आल्यासंदर्भात बोलत होते. तसेच आरोग्यविषयक पार्श्वभूमी नसलेल्या सहाय्यक अधीक्षकाच्या नेमणुकीबद्दलही न्यायालायने चिंता व्यक्त केली. या अधीक्षकांच्या वागणुकीसंदर्भातही न्यायालयाने शंका उपस्थित केली.
नक्की वाचा >> Kolkata Rape Case ला नवं वळण! आरोपीने पोलीस अधिकाऱ्याबरोबर काढलेल्या सेल्फीने खळबळ
घटनाक्रम आणि वेळेत ताळमेळ नाही
खंडपीठाने पोलिसांनी केलेल्या कारवाईची औपचारिकतेचा क्रम आणि कालावधीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. पीडितेचं शवविच्छेदन, अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्याच्या आधी 9 ऑगस्टच्या सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटे ते 7 वाजून 10 मिनिटांदरम्यान असल्याचं सांगण्यात आल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. "शवविच्छेदन 9 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजून 10 मिनिटांनी झालं आणि पोलिसांना अनैसर्गिक मृत्यूची माहिती रात्री 11 वाजता देण्यात आली, असं कसं झालं? ही फारच विचलित करणारी गोष्ट आहे," असं न्यायालयाने म्हटलं आहे.
150 मिलीग्रॅम वीर्य ऐकून सरन्यायाधीश काय म्हणाले?
सुनावणीदरम्यान वकिलाने 150 मिलीग्रॅम वीर्य असा उल्लेख केल्याने सरन्यायाधीश चांगलेच संतापले. हा उल्लेख ऐकताच सरन्यायाधीशांनी सोशल मीडियावर जे काही सुरु आहे ते इथे वाचून दाखवण्याची गरज नाही, असं म्हटलं. "पीडितेच्या शवविच्छेदनाचा अहवाल आमच्याकडे आहे", असं सरन्यायाधीशांनी वकिलाला सांगितलं. संतापलेल्या स्वरातच सरन्यायाधीशांनी, "150 ग्रॅमचा अर्थ काय होतो, हे आम्हाला ठाऊक आहे," असंही म्हणाले. काही बातम्यांमध्ये दावा करण्यात आला होता की पीडितेच्या शवविच्छेदनादरम्यान 150 ग्रॅम वीर्य आढळून आलं होतं.
नक्की वाचा >> Badlapur School Case: 'काठीवाल्या दादा'नेच केला घात; आरोपी अक्षय शिंदे आहे तरी कोण?
पहिली नोंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बोलावलं
या प्रकरणामध्ये पहिली नोंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोलकाता पोलिसाच्या या अधिकाऱ्याने पहिली नोंद नेमकी कधी करण्यात आली याची माहिती द्यावी असं न्यायालयाने सांगितलं आहे. सीबीआयची बाजू मांडणाऱ्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहत यांनी, "सर्वाधिक धक्कादायक बाब ही आहे की अत्यसंस्कारानंतर रात्री पावणे बारा वाजता आफआयआर दाखल करण्यात आली," असं न्यायालयाला सांगितलं. "राज्याच्या पोलिसांनी (पीडितेच्या) आई वडिलांना आधी तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं. नंतर ही हत्या असल्याचं सांगण्यात आलं. पीडितेच्या मित्राला या प्रकरणामध्ये काहीतरी लपवलं जात असल्याची शंका आली. त्याने व्हिडीओग्राफी करण्याची मागणी केली," असं सॉलिसिटर जनरल म्हणाले.
150 मिलीग्रॅम वीर्य प्रकरणामागील संदर्भ काय?
कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये पीडितेच्या शवविच्छेदनामध्ये 150 मिलीग्रॅम वीर्य आढळून आल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर यामागील सत्य काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला. फॅक्ट चेक करणाऱ्या 'अल्ट न्यूज' वेबसाईटने शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पीडितेच्या शरीरामध्ये 150 मिलीग्रॅम वीर्य सापडलं नसून 150 मिलीग्रॅम हे या पीडितेच्या जेनायटलचं (म्हणजेच गुप्तांगाजवळच्या इंद्रीयांचं) वजन असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे 150 मिलीग्रॅम वीर्य सापडल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं सिद्ध होत आहे. याचाच संदर्भ सर्वोच्च न्यायालयात देण्यात आल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला.