राहुल गांधींचा राजीनामा `आत्मघातकी` - लालू प्रसाद यादव
`एका निवडणुकीच्या निकालांमुळे देशाची वास्तविकता बदलू शकत नाही`
नवी दिल्ली : लोकसभा निडवणूक २०१९ मध्ये स्वीकारव्या लागलेल्या दणदणीत पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनाम्यावर अडून बसलेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC) बैठकीत राजीनामा सादर केला होता. गांधी-नेहरू कुटुंबीयांशिवाय एखाद्या वेगळ्या व्यक्तीच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रं द्यावीत, असंही त्यांचं म्हणणं होतं. राहुल गांधी यांच्या या निर्णयावर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींचा हा निर्णय 'आत्मघातकी' असल्याचं म्हटलंय.
'राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल. विरोधकांचं एकमेव ध्येय भाजपाला सत्तेतून दूर करणं होतं, परंतु, आम्ही ही राष्ट्रीय भावना तयार करण्यात अपयशी ठरलो. एका निवडणुकीच्या निकालांमुळे देशाची वास्तविकता बदलू शकत नाही' असं लालू यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
काँग्रेसमध्ये राजकीय अस्थिरता
लोकसभा निडवणुकीत पराभवानंतर वेगवेगळ्या राज्यांतील काँग्रेस पक्षाच्या एकूण सात प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. काँग्रेसच्या झारखंड, आसाम आणि पंजाब अध्यक्षांनीही आपापले राजीनामे सोपवलेत. याअगोदर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि ओडिशाच्या अध्यक्षांनीही आपापले राजीनामे सादर केले आहेत. तसंच कर्नाटकचे प्रदेश प्रचार समितीची अध्यक्ष एच के पाटील यांनीही आपला राजीनामा सोपवलाय.