`यूपीत हत्ती आहे की हत्तीण समजतं नाही` भाजपा खासदार बरळले
खासदार राजवीर सिंह यांची शनिवारी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारदरम्यान जीभ घसरली. प्र
महोबा : उत्तर प्रदेशच्या एटाहून भारतीय जनता पार्टीचे खासदार राजवीर सिंह यांची शनिवारी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारदरम्यान जीभ घसरली. प्रचार सभेला संबोधित करताना त्यांच्या जीभेचा तोल गेला आणि ते काहीही बरळले. चौथ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार थांबण्याआधी राजवीर सिंह यांनी महाआघाडीवर टीका केली. हत्तीवर सायकल चढेल की सायकलवर हत्ती ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. भाजपा खासदार एवढ्यावरच थांबला नाही. यावेळेस महाआघाडी पराभूत होऊन त्यानंतर 15 ते 20 वर्षे देशात निवडणूक होणार नाही असेही ते म्हणाले.
महोबाच्या चरखारीच्या विद्या मंदिर येथे भाजपा उमेदवार पुष्पेंद्र चंदेल यांच्यासाठी प्रचारसभा झाली. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांचे पुत्र भाजपा खासदार राजवीर सिंह हे यावेळी प्रचाराला आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. हत्ती आहे की हत्तीण आहे हे समजत नाही. जर सायकलवर हत्ती चढला तर सायकल दिसणारच नाही..माती होऊन जाईल. तुरुंगवास होऊ नये म्हणून लोकांनी महाआघाडी केली आहे. जर यावेळी तुम्ही महाआघाडीला घरी बसवले तर 15 ते 20 वर्षे देशात निवडणूक होणार नाही असे रणवीर म्हणाले.
काँग्रेस शौचालयाबद्दल बोलत होती. खूप लहान डोकं आहे. राहूल गांधी तुमची आज्जी आणि आई शेतात गेल्या असत्या तर तुम्हाला समजलं असतं अशी बोचरी टीका त्यांनी केली. देशाला सशक्त हातात द्यायचे असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. वस्तरा माकडाच्या हातात गेला तर तो सर्वांची दाढी करेल आणि स्वत:ची देखील करेल अशी टीका त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली.