NDA : लोकसभा निकालानंतर देशात सत्तास्थापनेला वेग आला आहे. भाजपप्रणित एनडीएला (NDA) 293 जागा मिळाल्या असून त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर  234 जागा मिळालेल्या इंडिया आघाडीकडूनही (INDIA Alliance) सरकार बनवण्याची स्वप्न पाहिली जात आहेत. अशात जेडीयूचे नीतिश कुमार (Nitish Kumar) आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी इंडिया आघाडीकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होती. पण आता नीतिश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी एनडीएला समर्थनाचं पत्र दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला समर्थन दिलंय. समर्थनाचं पत्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी सोपवल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.. त्यामुळे एनडीए लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचंही समजतंय. 


नितीश कुमार, चंद्राबाबू किंगमेकरच्या भूमिकेत
यंदाच्या लोकसबा निवडणुकीत भाजप बहुमताचा जादूई आकडा गाठण्यात अपयशी ठरलं. भाजपाला 240 जागा मिळाल्या. त्यामुळे जेडीयूचे नीतीश कुमार आणि टीडीपीचे के एन चंद्राबाबू नायडू सरकार स्थापण्यात किंग मेकर्सच्या भूमिकेत आहेत. जेडीयू आणि टीडीपीकडे 28 मतं आहेत. याशिवाय भाजपाला मित्रपक्षांचा पाठिंबाआहे. त्यामुळे एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. 


चंद्राबाबू नायडू यांची तेलगु देसम पार्टी आंध्रप्रदेशमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. टीडीपीने आंध्रात 25 पैकी तब्बल 16 जागा जिंकल्यात तर नीतीश कुमार यांच्या जनता दल युनायडेला बिहारमध्ये 12 जागा मिळाल्यात. 


चंद्राबाबू नायडू यांचं दबावतंत्र
दरम्यान, टीडीपीने एनडीएवर दबावतंत्राचा वापर करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यासाठी हा दबावतंत्र वापरला जातोय. लोकसभा अध्यक्षपद, अर्थ, कृषी, रस्ता वाहतूक, ग्रामीण विकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार खातं मागण्याची शक्यता आहे. जवळपास 5 ते 6 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय .टीडीपीला 16 जागा मिळाल्यायत त्यामुळे केंद्रात मोदींना पुन्हा सरकार बनवण्यासाठी टीडीपीला महत्त्व आलंय.