`मुस्लिमांमध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण अधिक`; ओवेसी म्हणाले, `मोदींना 6 भाऊ, शाहांना..`
Owaisi On Modi Children Remark: राजस्थानमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी या भाषणात मुस्लिमांची तुलना घुसखोरांशी केली होती. यावरुन बराच वाद निर्माण झाल्यानंतर आता ओवेसींनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Owaisi On Modi Children Remark: राजस्थानमधील निवडणूक प्रचारसभेमध्ये 'ज्यांची जास्त मुलं असतात' असा उल्लेख केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला आहे. हैदराबादचे खासदार असलेल्या ओवेसी यांनी मुस्लिम समाजामध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण फार अधिक आहे, असं भाषणादरम्यान म्हटलं आहे. तसेच दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यासंदर्भातही मुस्लिम समाज सजग असल्याचं ओवेसींनी नमूद केलं आहे.
मोदींना 6 भाऊ, अमित शाहांना 6 बहिणी
"मोदी म्हणतात की मुस्लिम जास्त मुलांना जन्म देतात. नरेंद्र मोदींना सहा भाऊ आहेत. अमित शाहांना सहा बहिणी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांना 10 ते 12 बहिणी आणि भाऊ आहेत," असं ओवेसींनी शुक्रवारी, 26 एप्रिल रोजी दिलेल्या भाषणामध्ये म्हटलं. मुस्लिम समाजातील जन्मदराचा आलेख हा घसरता असल्याचं केंद्र सरकारच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे असंही ओवेसी म्हणाले.
हिंदू बांधवांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न
'मुस्लिमांमधील जन्मदर घसरत आहे. मात्र नरेंद्र मोदी हे द्वेष पसरवण्यात आणि आपल्या हिंदू बांधवांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या देशात मुस्लिम कधीच बहुसंख्य होणार नाहीत. नरेंद्र मोदीजी अजून किती काळ तुम्ही मुस्लिमांची भिती दाखवत राहणार?' असा प्रश्न ओवेसींनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> 'राहुल गांधींनी लग्न केलं नाही तर आता त्यांचं...'; जाहीर प्रचारसभेत मोदींच्या मंत्र्यांचं विधान
'17 कोटी भारतीयांना घुसखोर म्हणालात'
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये केलेल्या 'घुसखोर' या उल्लेखावरुनही ओवेसींनी मोदींवर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 कोटी बारतीय मुस्लिमांना घुसखोर म्हणतात. तुम्ही घुसखोर आहात का?" असा प्रश्न ओवेसींनी उपस्थितांना विचारला. "दलित आणि मुस्लिमांविरोधातील द्वेष हीच पंतप्रधान मोदींची गॅरंटी आहे," असं ओवेसी म्हणाले.
मशिदीवर धनुष्य ताणण्यावरुन टोला
हैदराबादमधील भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार माधवी लता यांनी आपल्या निवडणूक प्रचारसभेदरम्यान ओल्ड सिटी परिसरातील मशिदीच्या दिशेने बाण ताणल्याची खूण केल्यावरुन ओवेसींनी निशाणा साधला. "ती कृती म्हणजे मशिदीकडे धनुष्यबाण ताणण्याची नव्हती तर शहरातील शांतता भंग करण्याचा तो प्रयत्न होता," असं ओवेसी म्हणाले.
नक्की वाचा >> 'मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..'
मोदींच्या विधानांवरुन वाद
राजस्थानमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी या भाषणात मुस्लिमांची तुलना घुसखोरांशी केली होती. तसेच विरोधी पक्ष देशाची संपत्ती जास्त मुलं असलेल्यांना वाटून टाकेल असंही मोदी म्हणाले होते. तसेच पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या कथित विधानाचा संदर्भ देत ते देशातील स्रोतांवर अल्पसंख्यांकांचा प्रथम अधिकार आहे, असं म्हणाल्याचा दावा केलेला. मोदींच्या या विधानावरुन बराच वाद निर्माण झाला असून अगदी निवडणूक आयोगाकडे याविरुद्ध लेखी तक्रारही करण्यात आली आहे.