LokSabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात असतील हे आता स्पष्ट झालं आहे. मंगळवारी त्यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नरेंद्र मोदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी नरेंद्र मोदी वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी पूजा केली. पंतप्रधान उमेदवारी अर्ज दाखल करत असताना एनडीएकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी 18 पेक्षा जास्त कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. अनेक मोठे नेते यावेळी हजर  होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्ज दाकल करत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यासोबतच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोळे आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा उपस्थित होते. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील होते. 


नरेंद्र मोदी अर्ज दाखल करत असताना अयोध्येत राम मंदिरातील (Ayodhya Ram Temple) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 'मुहूर्त' ठरवणारे पंडित गणेशवर शास्त्री यावेळी त्यांच्या शेजारी चार प्रस्तावकांपैकी एक म्हणून बसले होते. चार प्रस्तावकांपैकी एक ब्राह्मण, दोन ओबीसी आणि एक दलित आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रस्तावक कोण असतील अशी चर्चा गेल्या 15 दिवसांपासून रंगली होती. आधी 50 लोकांची यादी तयार करण्यात आली होती. यानंतर त्यातील 18 नावं निवडण्यात आली. या नावांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय महामंत्री सुनील बन्सल यांनी चर्चा केली होती. अखेर यातील चार नाव अंतिम कऱण्यात आली. नंतर पंतप्रधानांनी या नावांवर शिक्कामोर्तब केलं. 


मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मण समाजातून गणेश्वर शास्त्री, ओबीसी समाजातून वैजनाथ पटेल आणि लालचंद कुशवाह आणि दलित समाजातून संजय सोनकर यांची नावे निश्चित करण्यात आली. या समीकरणाने भाजपाने वाराणसी लोकसभेतील जातीय विभाजनाचा मुद्दा मांडला आहे. वैजनाथ पटेल हे जनसंघ समयचे कार्यकर्ते असून सेवापुरी हरसोस गावात राहतात.


सेवापुरी आणि रोहनिया विधानसभेत सुमारे 2 लाख 25 हजार मतदार आहेत. लालचंद कुशवाह ओबीसी आणि संजय सोनकर दलित समाजातून आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास येथे 3 लाखांहून अधिक ब्राह्मण, 2.5 पेक्षा जास्त गैर-यादव ओबीसी, 2 लाख कुर्मी आणि 1.25 लाख अनुसूचित जातीचे मतदार आहेत.