सर्वसामान्यांना झटका! एलपीजीच्या दरांत इतकी वाढ
सर्वाधिक दरवाढ या भागात झाली आहे
नवी दिल्ली : देशभरात coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर बऱ्याच व्यवहारांमध्ये महत्त्वाचे बदल झाले. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही याचे थेट परिणाम झाले. सध्याच्या घडीला लॉकडाऊनचे चार टप्पे पूर्ण केल्यानंतर आता देशात तीन टप्प्यांमधील अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
अनलॉक प्रक्रियेच्या याच टप्प्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. ज्याअंतर्गत बऱ्याच गॅस वितरण कंपन्यांनी घरगुती वापरातील एलपीजी सिलेंडरच्या दरांत वाढ केली आहे.
HPCL, BPCL, IOC या तेल कंपन्यांकडून विना अनुदानित एलपीजी अर्थात घरगुती वापरातील सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये ११.५० रुपयांनी वाढली आहे. परिणामी आता हे दर प्रति सिलेंडर ५९३ रुपयांवर पोहोचला आहे.
रेशन कार्डपासून गॅस सिलेंडरपर्यंतच्या नियमांमध्ये आजपासून 'हे' मोठे बदल
कोलकात्यामध्ये सिलेंडरच्या दरात तब्बल ३१.५० रुपयांनी वाढ झाली आहे. ज्या आधारे आता हे दर ६१० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईमध्ये हे दर ११.५० रुपयांनी वाढले आहेत. ज्यामुळं आता मुंबईकरांना एका विनाअनुदानित सिलेंडरसाठी ५९०. ५० रुपये मोजावे लागणार आहेत. देशभरात सध्याच्या घडीला चेन्नईमध्ये ही वाढ सर्वाधिक प्रमाणात झाली असल्याचं कळत आहे. चेन्नईत एलपीजीचे दर ६०६.५० रुपयांवर पोहोचले असून, यामध्ये ३७ रुपयांची दरवाढ समाविष्ट आहे.
दर महिन्याला तेल कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या आढाव्याच्या आधारे एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर निर्धारित केले जातात. त्याच धर्तीवर ही दरवाढ समोर आली आहे. किंबहुना सध्याच्या घडीला झालेल्या या दरवाढीचा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला होता.