रेशन कार्डपासून गॅस सिलेंडरपर्यंतच्या नियमांमध्ये आजपासून 'हे' मोठे बदल

देशात एकिकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम लागू करण्यात आलेले असतानाच नियमांच्या या सत्रामध्ये आता आज म्हणजेच १ जूनपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यांपैकी काही बदलांमुळं नागरिकांना अंशत: सूट मिळणार आहे. तर, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला याचा फटकाही बसू शकतो. 

Jun 01, 2020, 08:20 AM IST

मुंबई : देशात एकिकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम लागू करण्यात आलेले असतानाच नियमांच्या या सत्रामध्ये आता आज म्हणजेच १ जूनपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. यांपैकी काही बदलांमुळं नागरिकांना अंशत: सूट मिळणार आहे. तर, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला याचा फटकाही बसू शकतो. 

 

1/6

लागू होणार 'एक देश एक रेशन कार्ड'

देशभरातील गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी म्हणून जवळपास २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'वन नेशन वन कार्ड' ही योजना राबवण्यात येणार आहे. ज्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना देशातील कोणत्याही भागात त्यांच्या रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य मिळवता येणार आहे. जवळपास ६७ कोटी जनतेला याचा फायदा होईल. तीन रुपये प्रतिकिलो तांदूळ आणि दोन रुपये प्रतिकिलो गहू या दरानं धान्यवाटप करण्यात येणार आहे. स्थानिक, हिंदी किंवा इंग्रजी अशा भाषांमध्ये हे रेशन कार्ड दिलं  जाईल. याशिवाय रेशन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्याचंही केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.   

2/6

घरगुती वापरातील सिलेंडरच्या दरात बदल

तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडरच्या दरांचा आढावा घेतला जातो. ज्याअंतर्गत राज्यांमध्ये सिलेंडरचे दर बदलतात. तेव्हा आता सर्वांचं लक्ष या दरांकडे लागलेलं असेल.   

3/6

रेल्वे रुळावर

जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून लांब पल्ल्याच्या प्रवासी रेल्वे पुन्हा एकदा रुळावर आल्या आहेत. मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच याची सुरुवात झाली. वाराणासीच्या दिशेनं यावेळी पहिली रेल्वे रवाना झाली. रेल्वेकडून यावेळी अतिरिक्त अशा २०० रेल्वे रुळांवर येतील. शिवाय यापूर्वी कार्यरत असणाऱ्या ३० रेल्वे गाड्याही सुरुच राहणार आहेत.   

4/6

रेल्वे तिकीट आरक्षणात बदल

रेल्वे प्रवासासाठी कन्फर्म तिकीटानं प्रवास करुन इच्छिणाऱ्यांसाठी चार महिन्यांपूर्वीच तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. रविवारपासूनच ही सुविधा सुरु झाली आहे.   

5/6

राज्यांत पेट्रोल - डिझेलच्या दरांमध्ये बदल होणार

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मिझोरम, जम्मू काश्मीरसह इतरही राज्यांमध्ये तेल कंपन्यांचा एकंदर  अंदाज पाहता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ होण्याची चिन्हं आहेत.   

6/6

गो एअरकडून देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी विमानसेवा पुरवणाऱ्या गो एअर या कंपनीकडून १ जूनपासून पुन्हा एकदा कामाला सुरुवात  करण्यात येणार आहे. त्यामुळं आता धावपट्टीवर गो एअरची विमानंही दिसणार आहेत.