सोनिया गांधींना भेटल्यानंतर शरद पवारांचा `पॉवर गेम`
महाराष्ट्राच्या राजकारणात सुंदोपसुंदी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा गुगली टाकला आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात सुंदोपसुंदी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा गुगली टाकला आहे. शरद पवार यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी भेट घेतली. सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर आपण मुंबईत येऊन पुन्हा एकदा आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करु आणि पुन्हा सोनिया गांधींना भेटू, असं शरद पवार म्हणाले आहेत.
शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला कोणीतरी विचारायला तर हवं, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. तसंच आमच्याकडे सत्तास्थापनेसाठीचे आकडे नाहीत, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. मी राज्यात मुख्यमंत्री म्हणून जाण्याचा प्रश्नच नाही, असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं आहे.
भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या बार्गेनिंग गेम सुरु आहे का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला तेव्हा, त्यांच्यात हा सिरियस गेम सुरु असल्याचं शरद पवार म्हणाले.
राज्याच्या ग्रामीण भागात भाजपविरोधात वातावरण आहे, असं आपण सोनिया गांधींना सांगितल्याचं पवार म्हणाले. आम्हाला मिळालेला जनादेश हा विरोधी पक्षात बसण्याचा आहे, पण काय होईल हे सांगता येत नाही, असं सूचक विधान पवारांनी केलं आहे. सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीत एके ऍंटनी, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.