नवी दिल्ली : अखेर महाराष्ट्रातील (Maharashtra Assembly Elections 2019)  सत्तापेच सुटण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळाले आहेत. शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांनी संमती दिली आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि राज्यातील स्थितीबाबत माहिती देत चर्चा केली. त्यानंतर एक सामायिक कार्यक्रम ठवून चर्चा पुढे चालू ठेवली. आता या चर्चेला मोठे यश आले आहे. दरम्यान, काँग्रेसने ही सत्ता स्थापन करण्याआधी एक अट घातली आहे. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, हे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेला आपल्या मुद्याला मुरड घालावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्लीत राष्ट्रवादीसोबत झालेल्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची पक्ष मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला अशी माहिती पुढे आली आहे. या बैठकीसाठी मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी शिसेनेसोबत जाण्यास संमती दिली. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात १ डिसेंबर आधी शिवमहाआघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तसे संकेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत.



भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र काँग्रेसमधून काही नेत्यांचा तसेच खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यास विरोध केल्याची माहिती होती. अखेर सोनिया गांधी यांचे मन वळविण्यात शरद पवार यांना यश आले आहे. 


शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर  सोनिया गांधींसोबत राज्यातील सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, शिवसेनेसोबतही अशी कोणती चर्चा सुरु नसल्याचे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.  त्यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली. तर त्याआधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर चर्चा झाली होती. ही चर्चा मुंबईत झाली होती. 



दरम्यान, महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु आहे. दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सत्तास्थापन करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चा अधिक रंगू लागली. मोदी-पवार भेटीत काय घडले, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. या भेटीबाबत पवार यांनी कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. आमच्या भेटीत कोणतीह राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असे पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, आज पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.