बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात आतापर्यंतचं सर्वात मोठं यश; फरार मुख्य आरोपी शिवकुमारला अटक
Baba Siddique Murder: अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग या चार जणांना शिवकुमारला आश्रय दिल्याबद्दल आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
Baba Siddique Murder: काँग्रेस नेते बाबा सिद्धिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी शिवकुमारला (Shivkumar) अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बहारिचमधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिघांमध्ये शिवकुमारचा सहभाग होता. सूत्रांच्या माहितीनुसार तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. याप्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग या चार जणांना अटक केली आहे. यांनी शिवकुमारला आश्रय दिल्याबद्दल आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्धिकी यांची हत्या झाल्यापासून शिवकुमार फरार होता. उत्तर प्रदेश आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शिवकुमारला अटक करण्यात आली.
60 सुरक्षारक्षक, आधार कार्ड सक्ती अन्...; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शिवकुमारने चौकशीत तो लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचं कबूल केलं आहे. सध्या परदेशात असलेल्या अनमोल बिष्णोईच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आल्याचं त्याने सांगितलं आहे.
'मला गोळी लागलीये, मी...', मृत्यूआधी बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द काय होते?
तीन शस्त्रधारी हल्लेखोरांनी गर्दीच्या ठिकाणी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. यातील दोन गोळ्या त्यांच्या छातीला लागल्या, ज्या त्यांच्या मृत्यूचं कारण ठरल्या. गोळी लागल्यानंतर बाबा सिद्दिकी यांनाही मृत्यू जवळ आल्याची कल्पना आली होती.
बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हल्ल्यानंतर तिथे नेमकं काय घडलं याचा खुलासा केला आहे. एका कार्यकर्त्याने सांगितलं की, नमाज पठण केल्यानंतर झिशान यांनी आपल्या वडिलांना आपण खाण्यासाठी चेतना कॉलेजला जात आहोत असं सांगितलं होतं.
यावर बाबा सिद्दिकी यांनी आपण दोन ते तीन मिनिटांत आपलं काम पूर्ण करुन निघू असं उत्तर दिलं. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी नौपाडा येथे एका नवीन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पिता-पुत्राची बैठक नियोजित होती. बाबा सिद्दिकी पक्षाचे कार्यकर्ते, एक पोलीस अंगरक्षक आणि चालकासह कार्यालयातून बाहेर पडले होते. ते कारजवळ पोहोचताच हल्लेखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. रिपोर्टनुसार, दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीला लागल्या आणि एक गोळी तेथून जाणाऱ्या पादचाऱ्याच्या पायाला लागली.
गोळ्या लागल्यानंतर बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं. त्याआधी त्यांनी म्हटलं की, 'मला गोळ्या लागल्या आहेत, मी वाचणार नाही, मी मरेन'. लिलावती रुग्णालयात नेत असताना हे बाबा सिद्दिकी यांचे अखेरचे शब्द होते. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
झिशान सिद्दिकी यांची पोस्ट
वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique ) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये अशी आशा व्यक्त केली आहे. तसंच न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. "माझ्या वडिलांनी गरीब, निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण, बचाव करताना आपला जीव गमावला. आज माझे कुटुंब तुटलं आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये. त्यांचा मृत्यू नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा," असं झिशान सिद्दिकी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.