लखनऊ: पत्नीने करवा चौथचे व्रत न पाळल्यामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मथुरा जिल्ह्यातील मघेरा गावात हा प्रकार घडला. या गावात राहणाऱ्या दीप चंद या २१ वर्षीय तरुणाच्या लग्नाला अवघे चार महिनेच झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतात करवा चौथच्या व्रताला खूप महत्त्व आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला हे व्रत करतात. मात्र, दीप चंदच्या पत्नीने हे व्रत करायला नकार दिला. त्यामुळे दीप चंदने आत्महत्या केली.


घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 


आपल्या पत्नीने करवा चौथचे व्रत करावे म्हणून दीप चंद तिच्या मागे लागला होता. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने तिने हे व्रत करण्यास स्पष्टपणे नकार दिला. दीप चंदच्या आईनेही याला परवानगी दिली होती. 


मात्र, दीप चंद काहीही करून करवा चौथचे व्रत करण्यासाठी तिच्या मागे लागला होता. मात्र, पत्नीने नकार दिल्याने त्याने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले आणि स्वत:चे जीवन संपवले.