नीम करोली बाबांच्या आश्रमाजवळची जमीन सरकारने घेतली ताब्यात, आमदार पत्नीशी कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?
MLA Wife Land Dispute Seizes Property Near Kainchidham: मागील 15 वर्षांहून अधिक काळापासून या जमिनीचा वाद सुरु असून अखेर या प्रकरणामध्ये स्थानिक प्रशासनाने कारवाई करत जमीन ताब्यात घेतली असून आता हे प्रकरण राज्य सरकारकडे वर्ग केलं जाणार आहे.
MLA Wife Land Dispute Seizes Property Near Kainchidham: जनसत्ता दल (लोकशाही) पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशमधील कुंडा येथील आमदार रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैया यांची पत्नी भानवी सिंह यांच्या नावावर खरेदी करण्यात आलेली जमीन नैनीताल प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. कैंचीधामजवळ असलेल्या या जमिनीच्या तुकड्यावरुन मागील बऱ्याच काळापासून वाद सुरु होता. प्रशासनाने अखेर कारवाई करत जमीन सरकारच्या ताब्यात घेतली.
नक्की कुठे आणि किती क्षेत्रफळ असलेली ही जमीन आहे?
समोर आलेल्या माहितीनुसार, सरकारने ताब्यात घेतलेली ही जमीन नीम करोली बाबांच्या कैंचीधाम आश्रमाजवळ आहे. 19440 स्वेअर फुटांचा हा जमिनीचा तुकडा आहे. ही जमीन 2007 साली खरेदी करण्यात आली होती. तेव्हापासूनच या जमिनीसंदर्भात वाद सुरु आहे. हे प्रकरण सध्या राज्याच्या अबकारी आणि आय़ुक्त न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे. अबकारी आणि आयुक्त न्यायालयामध्ये राजा भैय्यांच्या बाजूने निकाल न लागल्याने सरकारने जमीन ताब्यात घेतली आहे. मागील काही काळापासून ही जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात सरकारच्या हलचाली सुरु होत्या. अखेर नैनिताल प्रशासनाने शुक्रवारी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.
मागील 15 वर्षांहून अधिक काळापासून सुरु आहे जमिनीचा वाद
ही जमीन नैनीताल जिल्ह्यातील कैंचीधाम येथे आहे. न्यायालयामध्ये हे प्रकरण मागील 15 वर्षांहून अधिक काळापासून सुरु असल्याने कायदेशीर कारवाई करत जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. प्रशासाने ही जमीन ताब्यात घेऊन तिच्यासंदर्भातील कागदपत्रं आणि इतर तपशील पुढे राज्य सरकारच्या विभागांकडे पाठवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नीम करोली बाबांचा आश्रम
नीम करोली बाबा हे मागील काही काळापासून अगदी इंटरनेटवरही चर्चेचा विषय आहेत. भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे नीम करोली बाबांचे शिष्य आहेत. या दोघांनी अनेकदा या आश्रमाला भेट दिल्याचं पाहायला मिळालं आहे. कैंचीधाम हे उत्तराखंडमधील कुमाऊं टेकड्यांमध्ये असलेलं एक सुंदर निर्जन टेकडीवरील आश्रम आहे. या ठिकाणी सर्वात आधी मंदिर जून 1964 मध्ये सुरु करण्यात आले. नैनितालपासून हा धाम 38 किमी अंतरावर आहे. मंदिरांमध्ये दररोज शेकडो भक्त दर्शनासाठी येतात. या ठिकाणी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते आणि आश्रमात राहणाऱ्या लोकांना सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीत सहभागी होणे बंधनकारक आहे. हा परिसर नैसर्गिकदृष्ट्या फारच सुंदर आहे.