रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि देशातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विरोधकांची बैठक घेतली. या बैठकीत सोनिया गांधींनी केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका केली. सध्याच्या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंत्रालयांच्या शक्ती आपल्याकडे घेतल्याची टीका सोनिया गांधींनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारने आर्थिक पॅकेज देऊन देशवासियांची चेष्टा केली आहे. लोक शेकडो किमी पायी चालत आहेत. या स्थलांतरित कामगारांसाठी सरकारने काहीही केलं नाही, असं सोनिया गांधी या बैठकीत म्हणाल्या. कामगारांना त्यांच्या घरी जाऊ द्या. सगळ्यांच्या खात्यावर थेट पैसे ट्रान्सफर करणं गरजेचं आहे, पण सरकारने ते केलं नाही, असा आरोप सोनिया गांधींनी केला आहे. 


काही भाजपशासित राज्यात कामगार कायद्यात बदल केले गेले आहेत. वास्तविक या कायद्यावर संसदेत चर्चा व्हायला पाहिजे होती, पण सरकारने ही चर्चा केली नाही. कामगार कायद्या बदल करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आमचा विरोध राहील, असं सोनिया गांधी म्हणाल्या.


देशाचा जीडीपी निगेटिव्हमध्ये जाणार आहे. अर्थव्यवस्था कोसळली आहे, यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, असं वक्तव्य सोनिया गांधींनी बैठकीत केलं. अम्फान चक्रीवादळात मृत्यू झालेल्यांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. 


सोनिया गांधींनी बोलावलेल्या या बैठकीला १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, स्टालिन यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थिती लावली. सोनिया गांधींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून, संजय राऊत सामना कार्यालयातून आणि शरद पवार पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमधून बसले होते.