जीएसटीसाठी मध्यरात्री संसद भरते; पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : राहुल गांधी
जीएसटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलेय. भाजप सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरु ठेवू शकते. मात्र, त्यांना शेतकरी प्रश्नावर वेळ नाही, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेय. ते राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत बोलत होते.
नवी दिल्ली : जीएसटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलेय. भाजप सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरु ठेवू शकते. मात्र, त्यांना शेतकरी प्रश्नावर वेळ नाही, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेय. ते राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत बोलत होते.
विरोधक संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला लागले तर त्यांना एक मिनिटही बोलू दिले जात नाही, हे भाजप सरकारचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित असले तरी हीच गत असते. जे सरकार जीएसटीसाठी मध्यरात्री संसद सुरु ठेवू शकते, त्यांना सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी थोडाही वेळ नसतो. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, असा हल्लाबोल राहुल यांनी चढवला.
राहुल यांनी विविध राज्यांमध्ये काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांचाही उल्लेख केला. काँग्रेसचे सरकार असलेल्या पंजाब आणि कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातही काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सरकारला कर्जमाफी द्यावी लागली. आता राजस्थानमध्येही काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव आणून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.