`रस्त्यात थांबवून माझे कपडे फाडले, मारहाण केली`; महिला डॉक्टरचे गंभीर आरोप
MP Crime : उज्जैन शहरातील खारकुआन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचा विनयभंग आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. त्यानंतर संतप्त लोकांनी खारकुआन पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.
MP Crime News: मध्य प्रदेशातील (MP News) उज्जैनमध्ये (Ujjain) फिजिओथेरपिस्टसोबत लैंगिक छळ झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी उज्जैनमधील गोलमंडी परिसरात काही लोकांनी फिजिओथेरपिस्ट तरुणीचा विनयभंग केला. आरोपीने कपडे फाडले, मला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यावेळी तिला वाचवण्यासाठी आलेल्या तरुणालाही आरोपींनी बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांकडून (MP Police) अटक करण्यात आली आहे.
उज्जैनमधील खारकुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिर्चीनाला परिसरात 28 जुलै रोजी ही घटना घडल्याचे म्हटलं जात आहे. संध्याकाळी 6 वाजता पीडित महिला फिजिओथेरपिस्ट स्कूटीवरून जात होती. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या हितेश नावाच्या तरुणाने फिजिओथेरपिस्टची स्कूटी थांबवली आणि चावी काढून घेतली. तरुणीचा विनयभंग होत असताना बचावासाठी आलेल्या एका व्यक्तीलाही आरोपीने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी खारकुआन पोलीस ठाण्याबाहेर लोकांनी निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. त्यानंतर आता प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.
"मिर्चिनालाच्या रस्त्यावर काही मुलं होती ज्यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं. मी गाडीवर होते. त्यांनी माझा स्टोल मागून ओढला. मी थांबल्यावर त्यांनी गाडीच्या चाव्या काढून घेतल्या. त्यांनी माझे कपडे फाडले. यावेळी मदतीसाठी आलेल्या एका व्यक्तीलाही त्या लोकांनी बेदम मारहाण केली. त्या गरीब माणसाने मला मदत केली म्हणून त्या लोकांनी त्याला जनावरासारखे मारले. त्या माणसाने मला पळून जाण्यास सांगितले. आरोपीने मला अशा प्रकारे चापट मारली आणि माझ्या ओठातून रक्त वाहू लागले. त्यानंतर त्याने मला शिवीगाळ केली. मला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श केला," असे पीडित मुलीने सांगितले.
या घटनेनंतर 29 जुलै रोजी काँग्रेस नेत्या नूरी खान यांच्यासह मोठ्या संख्येने लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला घेराव घातला. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मध्य प्रदेश काँग्रेसने यासंदर्भात ट्वीट करत रोष व्यक्त केला आहे. "शिवराजमध्ये असुरक्षित मुली, उज्जैनमध्ये घरी परतणाऱ्या फिजिओथेरपिस्टचा गुंडांनी विनयभंग केला आणि मारहाण केली. काँग्रेस नेत्या नूरी खान यांनी गुन्हेगारांना अटक करून न्याय मिळावा या मागणीसाठी एसपी कार्यालयाचा घेराव केला. शिवराज जी, मध्य प्रदेशमध्ये मुली कधी सुरक्षित होणार?," असा सवाल काँग्रसने विचारला आहे.
सरीकडे, उज्जैनचे पोलीस अधिक्षक सचिन शर्मा यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच पकडण्यात येईल, असे पोलीस अधिक्षक सचिन शर्मा म्हणाले.