`तुला इस्लाम माहिती नाही का?,` डिनरसाठी एकत्र आलेल्या हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणीला मारहाण; मदत करणाऱ्यांना भोसकलं
Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indore) येथे डिनर करुन निघालेल्या हिंदू (Hindu) तरुण आणि मुस्लीम (Muslim) तरुणीला जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या मदतीसाठी आलेल्या दोघांना यावेळी भोसकण्यात आलं असून ते जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indore) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डिनर करुन निघालेल्या हिंदू (Hindu) तरुण आणि मुस्लीम (Muslim) तरुणीला जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या मदतीसाठी आलेल्या दोघांना यावेळी भोसकण्यात आलं असून ते जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
गुरुवारी रात्री हा सगळा प्रकार घडला आहे. यादरम्यान गर्दीतील काही जण मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. या व्हिडीओची पुष्टी झालेली नाही. मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गर्दीत दिसणाऱ्या 20 पैकी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय झालं?
तरुण आणि तरुणी डिनर करुन बाहेर आल्यानंतर गर्दीने त्यांचा पाठलाग केला. स्कुटीवरुन निघालेल्या दोघांना यावेळी गर्दीने घेरलं होतं. यादरम्यान गर्दीतील एक तरुण तरुणीला तू दुसऱ्या धर्मातील मुलासोबत का आली आहेस? अशी विचारणा करत होता अशी माहिती अतिरिक्त पोलिस उपायुक्त राजेश रघुवंशी यांनी दिली आहे.
राजेश रघुवंशी यांनी सांगितल्यानुसार, "आपल्या पालकांना सांगितल्यानंतर आपण मित्रासोबत बाहेर जेवण्यासाठी आलो होतो असं तरुणीने सांगितलं. यादरम्यान दोन लोक त्यांच्या मदतीसाठी आले असता ते जखमी झाले आहेत. गर्दीतील कोणीतरी चाकूने त्यांच्यावर हल्ला केला".
दरम्यान व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, गर्दीने स्कुटीवर बसलेल्या दोघांना घेरलं होतं. यावेळी तिचा मित्र पूर्णपणे घाबरलेला दिसत आहे. यादरम्यान, गर्दीतील एक तरुण तरुणीला हा कोण आहे? तू रात्री गैरमुस्लीम तरुणासोबत का फिरत आहेस? तुझ्या कुटुंबाने परवानगी दिली आहे का? ऑनलाइन ऑर्ड करुन जेवण मागवता येत नाही का? यासाठीच हिजाब घातलायस का? तुला इस्लाम माहिती नाही का? अशी विचारणा करताना दिसत आहे. दरम्यान तरुणी यावेळी मला कायदा शिकवू नका असं सांगते. त्यावर तरुण मी तुला कायदा नाही इस्लाम शिकवतोय, इस्लामला खाली खेचू नका असं उत्तर देतो. यादरम्यान काहीजण तरुणावर हात उचलण्याचा प्रयत्न करतात. त्यावर गर्दीतील तरुण कोणीही मारहाण करु नका असं आवाहन करत असतो. पण काही वेळाने गर्दी त्याचं ऐकत नाही आणि मारहाण करताना दिसत आहे.
पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच गर्दीतील सात जणांची ओळख पटली आहे अशी माहिती टुकोगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलेश शर्मा यांनी दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी 23 आणि 26 वर्षीय दोन तरुणांना अटक केली आहे. याशिवाय 20 जणांच्या या गर्दीतील इतरांचीही ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांनाही अटक केली जाणार आहे अशी माहिती कमलेश शर्मा यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. या घटनेत सहभागी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.