नवी दिल्ली: मी राजकारणात प्रवेश केला तर माझी पत्नी घर सोडून निघून जाईल, असे वक्तव्य रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजकारणातील प्रवेशावर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून रघुराम राजन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. राजन यांनी काँग्रेसला निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यासाठीही मदत केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजन लवकरच राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, राजन यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले की, मी राजकारणात प्रवेश केला तर सर्वप्रमथ माझी पत्नी घरातून निघून जाईल. सगळ्याच ठिकाणी राजकारण सारखेच आहे. त्यामध्ये आक्रस्ताळेपणा असेल किंवा अजून काही वेगळे असावे. पण मला त्याचा जराही गंध नाही. इतर लोक भाषणं करून मतं मिळवू शकतात. मला सतत भूमिका बदलायची नाहीये. मी लिहलेली पुस्तके सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे सर्वांना माझी मते ठाऊक आहेत. एकूणच मला राजकारणात काडीचाही रस नाही, असे रघुराम राजन यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री केले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, रघुराम राजन यांनी आपली भूमिका स्पष्ट करून हा विषय कायमचा बंद केला आहे. रघुराम राजन सध्या शिकागो युनिव्हर्सिटीच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अध्यापनाचे काम करतात. याठिकाणी मी खूप आनंदी असल्याचेही राजन यांनी सांगितले. 


मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर रघुराम राजन यांना गव्हर्नरपदाची मुदत वाढवून देण्यात आली नव्हती. यानंतरच्या काळात राजन यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर टीकाही केली होती. नोटाबंदी व जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचे मत राजन यांनी व्यक्त केले होते.