`NAMO APP`च्या सर्वेक्षणामुळे भाजप खासदारांची धाकधुक वाढली
तुमच्या मतदारसंघातील तीन सर्वात लोकप्रिय भाजप नेत्यांची नावे सांगा
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवलंबिलेल्या नव्या पद्धतीमुळे भाजप खासदारांच्या मनातील धाकधुक वाढली आहे. सध्या भाजपकडून 'नमो अॅप'च्या माध्यमातून देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण केले जात आहे. पीपल्स पल्स असे या सर्वेक्षणाचे नाव आहे. यामध्ये मतदारांना तुमच्या मतदारसंघातील तीन सर्वात लोकप्रिय भाजप नेत्यांची नावे सांगा, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. थेट सामान्य मतदारांकडून मिळालेली ही माहिती खासदारकीची उमेदवारी निश्चित करताना महत्त्वपूर्ण ठरू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा बैठकीमध्ये खासदारांना सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी नमो अॅपचा आणि इतर सरकारी संकेतस्थळांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, प्रचाराच्या पारंपरिक पद्धतीवर विश्वास असणाऱ्या अनेक खासदारांनी याकडे कानाडोळा केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी निवडीसाठी 'नमो अॅप'चे सर्वेक्षण ग्राह्य धरले जाणार असल्याने या खासदारांची गोची होण्याची शक्यता आहे.
भाजपचे मिशन 2019 : या 6 निर्णयांनी शेतकरी आणि मध्यम वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ट्विटरवरून जास्तीत जास्त लोकांना या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तुमचे म्हणणे जाणून घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास आम्हाला मदत होईल, असे मोदींनी ट्विटरवरील व्हीडिओत म्हटले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहांनीही ट्विटरच्या माध्यमातून अशाच प्रकारचे आवाहन केले होते. तुमच्या मतदारसंघातील मुद्दे थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवा, असे शहा यांनी सांगितले.