रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली :  नाना पटोले हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्यासोबत ११ तारखेपासून ते गुजरातमध्ये प्रचार करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर हा पहिला प्रचार दौरा आणि सभा असणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.


भाजप खासदारकीचा सकाळी राजीनामा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघाचे भाजपकडून निवडून आलेले, नाना पटोले यांनी आज सकाळी खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना सोपवल्यानंतर, ते काँग्रेसच्या वाटेवर जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


भाजपच्या कृषी धोरणावर नाराज - नाना पटोले


नाना पटोले हे अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज होते, आपण भाजपच्या कृषी धोरणावर नाराज असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही भाजपचे मंत्री हे नरेंद्र मोदी यांना घाबरतात, असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं.


नानांची ही सवयच जुनी - रावसाहेब दानवे


नाना पटोले यांची पक्ष नेतृत्वावर टीका करण्याची जुनीच सवय असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. तरीही आम्ही विकासासाठी आमच्या वाटेवर अढळ राहून काम करू, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.


मुख्यमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया


तर ही जी बातमी आली, आणि जो निर्णय आहे, तो दुर्देवी असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे नाना पटोले यांचं समाधान करण्यात येईल, अशी आशा पक्षातील अनेक लोकांना होती, मात्र अखेर नाना पटोले यांनी भाजपची साथ सोडल्याचं स्पष्ट झालं आहे.