भाजपला आणखी एक धक्का, `एनडीए`तून आरएलएसपी बाहेर
केंद्रात सत्ता स्थापन करताना भाजपने देशातील छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांची मोठ बांधून सोबत घेतले. मात्र, ही राजकीय सोबत अधिक दुरावत चालल्याचे दिसून येत आहे. भाजपप्रणित एनडीए सरकारमधून मंत्री पदाचा राजीनामा देऊन फारकत घेताना छोटे राजकीय पक्ष दिसून येत आहेत.
नवी दिल्ली : केंद्रात सत्ता स्थापन करताना भाजपने देशातील छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांची मोठ बांधून सोबत घेतले. मात्र, ही राजकीय सोबत अधिक दुरावत चालल्याचे दिसून येत आहे. भाजपप्रणित एनडीए सरकारमधून मंत्री पदाचा राजीनामा देऊन फारकत घेताना छोटे राजकीय पक्ष दिसून येत आहेत. आधी 'तेलगू देसम'चे नेते चंद्राबाबू नायडू यांनी भाजपशी फारकत घेतली. हा कित्ता आता बिहारमधील 'राष्ट्रीय लोक समता पार्टी'चे नेते केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी गिरवलाय. त्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देताना एनडीएतून ते बाहेर पडलेत. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपसाठी मोठा धक्का
२०१९ची लोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा सहभाग असलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीत जाण्याचा पर्याय आपल्यासमोर आहे, असे उपेंद्र कुशवाह यांनी एनडीएतून बाहेर पडल्यानंतर सांगितले.
' मोदींनी बिहारची केली घोर निराशा'
मोदी सरकारने बिहारसाठी जे आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केलेले नाही. बिहारसाठी विशेष पॅकेज देण्याचे जाहीर केले होते, पण आमच्या राज्याच्या पदरात काहीच पडले नाही. शिक्षण आणि आरोग्याच्याबाबतीत बिहारची हीच स्थिती आहे. आपली घोर निराशा केलेय. तसेच मागासवर्गीय समाजांचा घोर विश्वासघात केलाय. बिहार या आमच्या राज्याला केवळ भुलथापा दिल्यात. मोदी सरकारने काहीही केलेले नाही. केवळ नावापुरते मंत्रीपद दिल्याचा आरोप उपेंद्र कुशवाह यांनी यावेळी केला.
केंद्रातील भाजप सरकारने फसवणूक केलेय. मागासवर्गीय समाजाला निराश केलेय. त्यांचे प्रश्न सोडविण्यात आलेले नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी मागासवर्गीयांतील अतिमागासांचे वर्गीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. पण ‘समिती’ तयार करून ते टाळण्यात आले, असे थेट हल्लाबोल त्यांनी केला. मोदी सरकार आरएसएसचा अजेंडा राबवत असल्याने केंद्र सरकारमध्ये राहणे योग्य नाही, असे ते म्हणालेत.
भाजपला इशारा
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीएला आमच्या राज्यात एकसुद्धा जागा जिंकता येणार नाही. बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपात भाजप आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ४० पैकी निम्म्या-निम्म्या जागा वाटून घेतल्या आहेत. लोकजनशक्ती पार्टी, आरएलएसपी या मित्रपक्षांना भाजपने विचारातही न घेतल्यामुळे गेले काही दिवस कुशवाह यांचा भाजपशी वाद सुरू होता. तसेच भाजपने केवळ दोन जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे नाराज झालेले उपेंद्र कुशवाह यांनी एनडीएची साथ सोडली.