नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणी हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे. यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. 'गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या न्यायप्रक्रीयेची प्रदीर्घ न्याप्रक्रीयेचा आज समारोप झाला. भारताची लोकशाही जिवंत आणि सशक्त असल्याचा पुरावा म्हणजे रामजन्मभूमी निकाल आहे' असं त्यांनी यावेळी म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आज विविधतेत एकता आज अधोरेखित झाली. हजारो वर्षानंतरही भारतातल्या एकतेला बाधा आलेली नाही. देशानं निकाल खुल्या दिलानं स्वीकारला. उल्लेखनीय म्हणजे, सर्वसंमतीनं हा निर्णय आला. या निर्णयाद्वारे देशवासियांनी नवा इतिहास रचला. यासाठी, न्यायाधीश आणि न्यायप्रणालीचं अभिनंदन करतो. या निकालामागे कोर्टाची दृढ इच्छाशक्तीच कारणीभूत ठरली' असं म्हणत पंतप्रधानांनी न्यायप्रणालीचे आभार मानले. 


 


'आज ९ नोव्हेंबर... हा तोच दिवस जेव्हा बर्लिनची भिंत कोसळली होती. आज याच दिवशी करतारपूर कॉरिडोरची सुरुवात झालीय. यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा सहभाग राहिला. अयोध्या निर्णयानंतर हा दिवस सोबत राहून पुढे वाटचाल करण्याची शिकवण देत आहे. नव्या भारतात भय, कटुता आणि नकारात्मकतेला कोणतंही स्थान असू नये' असं म्हणत त्यांनी एकतेचा राग आळवला. 


'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं कठिणातल्या कठिण प्रश्नाचं उत्तर कायद्याच्या चौकटीतच मिळतं. कोणतीही परिस्थिती आली तरी, कितीही वेळ लागला तरी धैर्य कायम राखणं गरजेचं आहे. या आमच्या परंपरेवर आमचा विश्वास अतूट राहणं गरजेचं आहे. हा निकाल आपल्यासाठी नवी पहाट घेऊन आलाय. या निकालानं देशाच्या प्रत्येक नागरिकावर राष्ट्र निर्माणाची जबाबदारी आणखीनच वाढलीय' असं म्हणत 'नवी पिढी नव्या भारतासाठी झटेल' असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं.