नवी दिल्ली : उत्तरप्रदेश - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी याचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रान्च) सोपवण्यात आलाय. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा नव्यानं सुरु करण्यात आलाय. शुक्रवारी क्राईम ब्रान्चची एक टीम आणि वरिष्ठ अधिकारी दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी स्थित तिवारींच्या घरी दाखल झाली. त्यांनी घराची झाडाझडती घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्राईम ब्रान्चच्या अधिकाऱ्यांनी सध्या या प्रकरणावर कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. कोणताही ठोस पुरावा किंवा माहिती हाती लागत नाही तोवर या प्रकरणावर काहीही बोलण्यास त्यांना असमर्थतात दर्शवलीय. १६ एप्रिल रोजी रोहित शेखर तिवारी याचा अचानक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झाला होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नव्हत्या. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम घरातल्या नोकरांनी रोहितच्या नाकातून रक्त बाहेर पडताना पाहिलं होतं. रोहितला न्यूरोशी निगडीत त्रास असल्याचंही सांगण्यात येतंय. दक्षिण दिल्लीचे डीसीपी विजय कुमार यांनी रोहितच्या घराच्या झाडाझडतीशिवाय नोकर आणि कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं होतं. 


उज्ज्वला तिवारी 

एनडी तिवारींचा मुलगा


रोहित तिवारीनं काही वर्षांपूर्वी आपल्या वडिलांविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला होता. मुलाचा अधिकार मिळवण्यासाठी एनडी तिवारी हेच आपले जैविक पिता असल्याचं रोहितला कोर्टात सिद्ध करावं लागलं होतं. एनडी तिवारी यांनी पहिल्यांदा रोहितला आपला मुलगा मानण्यास नकार दिला होता. मात्र डीएनए रिपोर्टनुसार, रोहित हा एनडी तिवारींचाच मुलगा असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर २०१४ मध्ये एनडी तिवारी यांनी रोहित शेखर यांच्या आईशी वयाच्या ८९ व्या वर्षी विवाह केला होता. रोहितनं जानेवारी २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. 



रोहित शेखरची आई उज्ज्वला तिवारी यांनी मात्र रोहितचा मृत्यू सामान्य असल्याचा दावा केलाय. रोहितच्या मृत्यूवर आम्हाला कसलाही संशय नसल्याचंदेखील त्यांनी म्हटलंय. परंतु, काही कारणामुळे रोहित तणावाखाली होता. योग्य वेळ आल्यावर त्याचा खुलासा आपण करूच, असंही उज्ज्वला तिवारी यांनी म्हटलंय. 


एन. डी. तिवारी यांचं गेल्या वर्षी १८ ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने निधन झालं होतं.