तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील (Hyderabad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्वानावरुन झालेल्या वादातून एका जोडपल्याला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. पाळीव श्वानामुळे संतापलेल्या शेजाऱ्यांनी रस्त्यावरच पतीला मारहाण केली. पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता त्यांनी तिलाही सोडलं नाही. यावेळी अनेकजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तरुण ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत एक व्यक्ती श्वानाला घेऊन रस्त्यावर उभा असताना काही तरुण हातात काठ्या घेऊन येतात आणि मारहाण करण्यास सुरुवात करत असल्याचं दिसत आहे. हैदराबादच्या रहमत नगर परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राहणारे लोक या श्वानामुळे त्रस्त होते. हा श्वान कोणाच्याही घरात घुसत असे. तसंच रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांनी चावण्यासाठी धावत आहे. पण दांपत्य मात्र याकडे दुर्लक्ष करत होतं. लोकांना श्वानापासून वाचवण्यासाठी ते कोणताही प्रयत्न करत नव्हते. 


अखेर याच गोष्टीमुळे शेजाऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी संतापाच्या भरात श्वानाच्या मालकावर हल्ला केला. त्यांची पत्नी मधे पडली असता त्यांनी तिलाही मारहाण केली. माहितीनुसार, श्रीनाथ नावाच्या व्यक्तीचा पाळीव श्वान एक दिवस धनंजय यांच्या घरी गेला होता. यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की, संतापलेल्या शेजाऱ्याने आपल्या मित्रांच्या मदतीने श्रीकांत आणि पत्नी यांना बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे त्यांनी श्वानालाही सोडलं नाही. या हल्ल्यात श्रीनाथ आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. 


व्हिडीओत काय दिसत आहे?


व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, श्रीकांत घराबाहेर श्वानाला घेऊन उभे होते. यावेळी काही लोक तेथून जात असताना कुत्रा त्यांच्यावर भुंकत होता. याचवेळी दुसऱ्या बाजूने काही लोक हातात काठ्या, लाठी घेऊन आले आणि श्रीकांत यांच्यावर हल्ला केला. पतीला मारहाण होताना पाहून त्यांच्या पत्नीने धाव घेतली. पण तरीही हल्ला थांबला नाही. अखेर तिथे राहणाऱ्या काही महिला मधे पडल्या आणि त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण यानंतर ते थांबवण्यास तयार नव्हते. यानंतर तिथे मोठी गर्दी जमा झाली होती. अखेर तरुण तेथून पळून गेले. पण जाता जाता त्यांच्याती एकाने श्वानावरही लाठीने हल्ला करत त्याला खाली पाडलं.