श्रीमंत व्हायचंय? गुंतवणुकीपूर्वी या ३ प्रश्नांची उत्तरे नक्की शोधा!
तुम्ही कोणता पर्याय निवडता, किती जोखीम घेण्यास तयार होता यावरच तुम्हाला किती परतावा मिळणार हे अवलंबून असते.
मुंबई - अधिकाधिक पैसा कमावणे, ही प्रत्येक सजग माणसाची प्राथमिकता असते. त्यासाठी सगळेच जण कष्ट करत असतात. पण श्रीमंत होण्यासाठी प्रत्येकवेळी बॅंकेत मोठी शिल्लक असणे आवश्यक असते, असे नाही. योग्य पद्धतीने केलेली गुंतवणूकही तुम्हाला श्रीमंत करण्यास उपयुक्त ठरते. आजकाल गुंतवणुकीसाठी अनेकविध पर्याय गुंतवणूकदारांपुढे उपलब्ध आहेत. तुम्ही कोणता पर्याय निवडता, किती जोखीम घेण्यास तयार होता यावरच तुम्हाला किती परतावा मिळणार हे अवलंबून असते. आजच्या काळात एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून पुढे आला आहे. यामध्ये महिन्याला ३००० रुपये गुंतवून साधारणपणे अंदाजे १५ वर्षांत साडेबारा लाखांपर्यंत परतावा मिळू शकतो. म्हणजे वर्षाला १० टक्के व्याजदराने तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर परतावा मिळतो. तुम्ही महिन्याला आणि नियमितपणे किती गुंतवणूक करू शकता, यावर तुम्हाला किती परतावा मिळणार हे अवलंबून असते. जर हिच रक्कम तुम्ही तुलनेत सुरक्षित योजनांमध्ये गुंतवली तर मिळणारा परतावा कमी होऊ शकतो. म्हणजे जर हिच रक्कम तुम्ही सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमध्ये गुंतवल्यास १५ वर्षांनतर साधारणपणे ८ टक्क्याने साडेदहा लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.
कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराने खालील तीन प्रश्नांची उत्तरे आवर्जून शोधली पाहिजेत.
१. गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये काय आहेत?
गुंतवणूक करताना त्यामागे निश्चित असे कारण असते. कोणतेतरी आर्थिक उद्दिष्ट ठेवूनच गुंतवणूक केलेली असते. मग ते उद्दिष्ट निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाचे असू दे, मुलांच्या शिक्षण खर्चाचे असू दे, घर घेण्याचे असू दे किंवा परदेशी प्रवासाला जाण्याचे असू दे. या आणि इतर कारणांसाठी दीर्घकालीन किंवा अल्पकालीन गुंतवणूक केली जाते. कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करायची आहे, यावर ती अल्पकालीन असेल की दीर्घकालीन हे अवलंबून असते. जर गुंतवणूकदाराचे वय २५ ते ३० च्या घरात असेल, तर त्याला साधारणपणे १० ते १५ वर्षांनी परताव्याची अपेक्षा असू शकते. या स्थितीत गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. मग त्यामध्ये पीपीएफचाही समावेश होऊ शकतो.
२. करामध्ये फायदा आहे का?
ज्या योजनेमध्ये गुंतवणूक करणार आहोत. त्यामधून आपल्याला कर वाचविण्यासाठी काही फायदा होणार आहे का, हा विचार गुंतवणूकदाराच्या मनात येतोच. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी किंवा विम्याच्या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत वाचवू शकतात. अर्थात यामधून केवळ कर वाचविण्यास मदत होते. पण गुंतवणुकीतून मोठा लाभ होत नाही. त्यामुळे ते गुंतवणूकदाराने आधीच ठरवणे आवश्यक आहे.
३. परतावा काय?
आपण जिथे कुठे गुंतवणूक करतो आहोत, त्यातून परतावा काय मिळणार, याचा विचार सर्वात आधी केला पाहिजे. बॅंकातील मुदत ठेवींमध्ये केलेली गुंतवणूक कमी जोखमीची असते. पण त्यातून परतावाही फारसा येत नाही. त्याचवेळी म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक तुम्हाला अधिक परतावा देऊ शकते. खूप परतावा देणाऱ्या योजना फसव्या असू शकतात. त्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक करताना जास्त विचार करावा. साधारणपणे वर्षाला २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देण्याचे आश्वासन कोणती योजना देत असेल, तर त्याबद्दल जास्त काळजी घ्यावी. त्याची नीट चौकशी करावी. कारण अशा योजना फसव्या असू शकतात.