मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मूतील ड्रोन हल्ल्याचा तपास NIAकडे सोपवला आहे. हल्ल्यासंबंधी प्राथमिक अहवाल मंत्रालयाकडे सोपवण्यात आल्यानंतर हा तपास एनआयकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. NIAने तपासाला सुरुवातही केली आहे. दरम्यान अधिकृतपणे तपास सुरु करण्यासाठी एनआयकडून गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी RDX किंवा TNTचा वापर केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ड्रोन सीमेपलीकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Jammu airport drone attack, Centre hands over probe to NIA)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मूमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला  करण्यात  आला होता. दरम्यान, आणखी दोन ड्रोनची घुसखोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. ड्रोनच्या सहाय्याने हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असल्याचा संशय आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे.



दहशतवाद्यांनी ड्रोन विमानातून स्फोटके पाठवून रविवारी भारतीय हवाई दल केंद्रावर हल्ला केला होता. त्यात दोन बॉम्बचा समावेश होता. त्यात दोन अधिकारी जखमी झाले होते. ड्रोन्सच्या मदतीने जम्मूत करण्यात आलेला हा पहिलाच हल्ला होता.  लष्करी भागात सोमवारी दोन ड्रोन्सवर लष्कराच्या जवानांनी सतर्कता दाखवत गोळीबार केला. रविवारी रात्री 11.45  वाजता पुन्हा एक ड्रोन विमान हद्द ओलांडून आले होते. त्यानंतर दुसरे ड्रोन पहाटे 2.40 वाजता आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तेथे उपस्थित सैनिकांनी गोळीबार करताच ही दोन्ही ड्रोन विमाने माघारी गेली. दरम्यान, लष्करी केंद्राच्या सभोवताली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.