मुंबई : प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने हीरे व्यापारी नीरव मोदीला दणका दिला आहे. ईडीने नीरव मोदीची ३२९.६६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतल्या वरळीतील समुद्र महल या आलिशान बिल्डिंगमधील चार फ्लॅट, एक सी-साईड फार्म हाऊस, अलीबागमधली जमीन, जैसलमेरमधील पवन चक्की, लंडनमधील फ्लॅट, युएईमधला रेसिडेन्शियल फ्लॅट, शेयर आणि बँकमध्ये जमा असलेल्या रकमेचा समावेश आहे. जूनमध्ये मुंबईतल्या कोर्टाने नीरव मोदीची १,३९६ कोटीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीने मार्च २०२० साली नीरव मोदीच्या अनेक संपत्तीचा लिलाव केला होता. यामध्ये महागडी घड्याळं, पेंटिग्स, गाड्या यांच्यासह अनेक वस्तूंचा समावेश होता. ईडीने दिलेल्या माहितीनुसार यातून ५१ कोटी रुपये मिळाले होते.


पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी सध्या लंडनमधल्या जेलमध्ये आहे. भारताच्या अपीलनंतर लंडन पोलिसांनी प्रत्यार्पण वॉरंट जारी झाल्यानंतर १९ मार्चला नीरव मोदीला अटक केली होती. नीरव मोदीविरुद्ध ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. याप्रकरणी ७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.