नवी दिल्ली: हिरेव्यापारी नीरव मोदी याला लंडनमध्ये करण्यात आलेली अटक हा केवळ राजकीय उत्सव असल्याची टीका सॅम पित्रोदा यांनी केली आहे. 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भाजपच्या काळात सर्वाधिक आर्थिक गुन्हेगारांना शासन झाले, असा दावा सरकारकडून नेहमी करण्यात येतो. तसेच यूपीए सरकारच्या काळात कर्ज देण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असे, असा आक्षेपही भाजपकडून नेहमी घेण्यात येतो. याविषयी पित्रोदा यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, भाजपच्या या दाव्यांना मी काही भुलणार नाही. माझे म्हणणे इतकेच आहे की, राजकीय हेतूने प्रेरित सोहळे साजरे करण्यात कोणताही अर्थ नाही. नीरव मोदीची अटक हादेखील असाच राजकीय उत्सव होता, अशा शब्दांत पित्रोदा यांनी मोदी सरकारला फटकारले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल १३ हजार कोटींची गैरव्यवहार करुन फरार झालेल्या नीरव मोदीला बुधवारी लंडनमध्ये पोलिसांनी अटक केली होती. यानंतर मोदीला २९ मार्चपर्यंत कोठडीत पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे भारतीय तपासयंत्रणांनीही नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. नीरव मोदीच्या अटकेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले होते. 


याविषयी बोलताना सॅम पित्रोदा यांनी म्हटले की, नीरव मोदीसंदर्भात काय निर्णय घ्यायचा, ते न्यायालयाला ठरवू द्या. यामध्ये कसली अडचण आहे? कायद्याला आपले काम करु द्या. भारतातील पैसा घेऊन परदेशात पळून जाणाऱ्यांना शासन करण्यासाठी देशातील न्यायव्यवस्था समर्थ आहे, असे मत पित्रोदा यांनी मांडले. 



तुम्हाला देशाची बांधणी कशाप्रकारे करायची आहे, यासाठी मी सर्वसमावेशक आणि अधिक पवित्र दृष्टीकोनातून विचार करतो. एखादी व्यक्ती पाच ते सहा हजार कोटी घेऊन देशाबाहेर गेली, ते ठीक आहे. मात्र, या सगळ्याचा देश उभारणीशी संबंध जोडण्यात काहीही अर्थ नाही. सध्या अशीच द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसमावेशकतेला प्राधान्य द्यायचे की जिथे प्रत्येकजण विभागलेला असेल अशा देश आपल्याला हवा आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.