अजित मांढरे, प्रतिनिधी, मुंबई : संपूर्ण देशात चर्चा असलेल्या पीएनबी गैरव्यवहारांच्या संबंधी एक धक्कादायक खुलासा झालाय... नीरव मोदीनं फक्त बॅंकेलाच नाही तर बॅंकेतल्या ज्या अधिका-यांनी गैरव्यवहार करण्यासाठी मदत केली त्यांनाही टोपी लावलीय... 


नीरव मोदीची मोडस ऑपरेंडी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महाठग नीरव मोदीनं कसा घोटाळा केला, त्याची मोडस ऑपरेंडी ईडीच्या तपासात उघड झालीय. 


- नीरव मोदीनं बँकेतून १ मार्च २०१० ला २८० कोटी रुपयांचं क्रेडीट एलओयूच्या माध्यमातून घेतलं. जे त्याला ९० दिवसांच्या आत भरायचं होतं


- ९० दिवस संपायच्या आत नीरव मोदीनं बॅंकेतल्या अधिका-यांना अगदी काही हजार रुपयांचं आमिष दाखवून पुन्हा दुप्पट रकमेचा एलओयू पास करुन घेतला


- नवीन एलओयूतून त्यानं आधीच्या एलओयूचे व्याजासहीत पैसे भरले आणि उर्वरित रकमेचा अपहार केला 


'एलओयू' कसं व्हायचं पास?


नीरव मोदी आणि मेहूल चौकसी आधीच्या एलओयूची (लेटर ऑफ अंडरटेकिंग) रक्कम भरण्यासाठी बँकेतल्या अधिकाऱ्यांना लाच देऊन नवीन एलओयू पास करवून घ्यायचे, असं करत करत त्यांनी जवळपास ११ हजार ५०० कोटी रुपयांचे एलओयू पास करुन घेतले.


२०११ या वर्षात निरव मोदी आणि टीमला तब्बल १५० पेक्षा जास्त एलओयू पत्र जारी करण्यात आले होते. याआधारे परदेशी बॅंकांमधून नीरव मोदीने साडे सात हजार कोटी रुपये काढले होते. त्यानंतर २०१७ पर्यंत नीरव मोदीला आणखी १४३ एलओयू पत्र जारी करण्यात आले होते. त्या माध्यमातून नीरव मोदीने भारतीय कंपन्यांमधून जवळपास ३ हजार कोटी रुपये काढले होते.


पाच अधिकाऱ्यांना अटक 


पंजाब नॅशनल बॅंकेचे अधिकारी यांच्या मार्फत पंजाब नॅशनल बँकेचेच पैसे वापरुन नीरव मोदी आणि मेहूल चोकशी टीम गेली ७ वर्षे पंजाब नॅशनल बॅंकेला फसवत होता ... आता एवढा मोठा गैरव्यवहार होताना बॅंकेच्या वरीष्ठ अधिका-यांची सहमती होती का? असा ही प्रश्न सर्व सामान्यांना पडलाय.


१५ फेब्रुवारीला पंजाब नॅशनल बॅंकेनं पत्रकार परीषद घेऊन बॅंकेच्या काहीच अधिकाऱ्यांनी नीरव मोदीला मदत केल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार बॅंकेचा व्यवस्थापक गोकुळ शेट्टी आणि एक खिडकी अधिकारी मनोज खरातला अटक करण्यात आली... पण तपासात गोकुळ शेट्टीच्या वरीष्ठांनी जाणीवपूर्वक त्याच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष करुन एक प्रकारे त्याला मदतच केल्याचे उघड होताच बेचू यादव, यशवंत जोशी आणि प्रफुल्ल सावंत या पीएनबीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली.


आणखीही अधिकारी रडारवर 


पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी सुरुवातीला सीबीआयने २ नंतर ३ असे एकूण ५ अधिकारी जेरबंद केले. आता तर जवळपास आणखी ११ असे अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांनी काही हजार रुपयांसाठी या गैरव्यवहारात विविध प्रकारे सहकार्य केलंय. एवढच नाही तर पंजाब नॅशनल बॅंकेच्या ब्रॅन्डी हाऊस या शाखेतील जवळपास ४० अधिकारी कर्मचारी हे नीरव मोदीचे चाकरीच करत होते का? असा प्रश्न आता तपास यंत्रणांना पडलाय. त्यामुळे ब्रॅन्डी हाऊस शाखेला टाळं लावून सर्व कर्मचाऱ्यांना सीबीआयने चौकशी करता बोलावलं आहे.