अजब - गजब : या व्यक्तीला काचा खाण्याचा छंद
सुरुवातीला छंद म्हणून काचा खाणं आता त्यांचं `व्यसन` बनलंय
डिंडौरी, भोपाळ : जगात अजब-गजब कारनामे करणाऱ्यांची कमी नाही. असाच एक व्यक्ती मध्य प्रदेशच्या डिंडौरी जिल्ह्यातही आहे. शहपुराचा रहिवासी असलेला दयाराम साहू याला काचा खाण्याचा छंद आहे. व्यवसायानं वकील असलेले दयाराम मजेनं काचा खाताना दिसतात. बरं ही सवय त्यांना लहानपणापासूनच आहे. फोटोमध्ये तुम्हाला दयाराम काचेचा बल्ब आणि काचेच्या बाटल्यांचे तुकडे चावताना दिसतच असतील.
आणखी धक्कादायक म्हणजे, दयाराम यांची पत्नी त्यांना काचा खाण्यापासून अजिबात रोखत नाहीत. तर त्या त्यांना प्रोत्साहनच देताना दिसतात. लग्नानंतर आपण जेव्हा सासुरवाडीत पाऊल टाकलं त्यानंतर पतीला लपून-छपून काचा खाताना पाहिलं. पहिल्यांदा समजलं तेव्हा धक्काच बसला. सुरुवातीला त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. त्यामुळे आता मी त्यांना काचा आणून देते, असं दयाराम यांच्या पत्नीनं म्हटलंय.
दयाराम यांच्या या अजब छंदाबद्दल त्यांना विचारलं असता, लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती आणि म्हणूनच आपण काचा खाणं सुरू केल्याचं त्यांनी म्हटलं. पण, सुरुवातीला छंद म्हणून काचा खाणं आता त्यांचं 'व्यसन' बनलंय.
दयाराम यांच्या म्हणण्याप्रमाणे, अगोदर ते किलोभर काचा सहज खात होते. पण आता मात्र दात खिळखिळे झाल्यानं त्यांनी काचा खाणं कमी केलंय.