मोठी बातमी: भारतात कोरोना व्हायरसचा शिरकाव; केरळमध्ये सापडला पहिला रुग्ण
डॉक्टरांचे एक पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
नवी दिल्ली: संपूर्ण जगाला हादरवरून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. केरळमधील एका तरुणाला Coronavirus ची बाधा झाल्याचे समजते. हा तरुण चीनच्या वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता. यावेळी त्याला Coronavirus ची लागण झाल्याचा अंदाज आहे. या विद्यार्थ्याची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खास उपाय
कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे. आतापर्यंत या व्हायरची लागण होऊन १७० जणांचा बळी गेला आहे. तर तब्बल सात हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. तत्पूर्वी दिल्लीच्या राममनोहर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोनाच्या तीन संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्रिपुरातील एका कुटुंबाने मलेशियात राहत असलेल्या आपल्या नातेवाईकाचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाल्याचा दावा केला होता.
कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे जगभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील वुहान हे शहर कोरोना व्हायरसचे केंद्र झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे भारतात तयार करण्यात येणाऱ्या एन-९५ मास्कची मागणी प्रचंड वाढली आहे. परिणामी तामिळनाडूच्या मुदरै येथील कारखान्यांमध्ये कामगारांना जास्त वेळ काम करावे लागत आहे.
दरम्यान, चीनच्या वुहान विद्यापीठात मोठ्याप्रमाणावर भारतीय विद्यार्थी शिकायला आहेत. या विद्यार्थ्यांना विमानमार्गे थेट भारतात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने चीनची परवानगी मागितली होती.