मुरादाबाद : कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात दिवसागणिक वाढतच चालला आहे. ज्यामुळे प्रशासनाच्या यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. देशभरात Coronavirus चा झापाट्याने होणारा प्रादुर्भाव पाहता अनेक ठिकाणी विशेष काळजी घेण्यात येत आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय या सर्वांचीच प्रशासनाकडून काळजीही घेण्यात येत आहे. पण, डॉक्टर, आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पोलिसांचे हे प्रयत्न मात्र काही ठिकाणी रोषाचे धनी होताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएऩआय' या वृत्तसंस्थेने सध्या असाच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. जिथे मृत कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबाला आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य अधिकारी, डॉक्टर आणि पोलिसांच्या चमूवर दगडफेक करण्यात आल्याचं संतापजनक कृत्य घडलं आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे ही घटना घडली आहे. 


कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या कुटुंबाला सावधगिरी म्हणून क्वारंटाईन करण्यास नेण्यासाठी हे पथक आलं होतं. पण, तेव्हाच त्या परिसरात राहणाऱ्यांनी घरांच्या छतांवरून अत्यावश्यक सेवांतील या चमूवर दगडफेक केली. 


दगडफेकीमध्ये एकूण तिघेजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यामध्ये एक डॉक्टर आणि एका फार्मासिस्टचा समावेश आहे. आरोग्य विभाग किंवा पोलीस अधिकाऱ्यांवर नागरिकांनी असे हल्ले करण्याची ही पहिली वेळ नाही. कोरोनाच्या  तणावग्रस्त वातावरणात यापूर्वीही असे धक्कादायक प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आपली सुरक्षितता दूर लोटत नागरिकांच्या हितासाठी सातत्याने दिवसरात्र काम करणाऱ्या या कोरोना वॉरिअर्सना मिळणारी ही वागणूक देशातील नागरिकांच्या एकंदर मानसिकतेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करत आहे. 



 


कोरोनाशी लढा देत असताना सर्वाधिक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे नागरिकांच्या सहकार्याची. या विषाणूवर मात करण्यासाठी म्हणून अहोरात्र  कष्ट करणाऱ्या असंख्य डॉक्टरस, पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांचे एका वर्गातून आभार मानले जात असतानाच दुसरीकडे अशा प्रकारे त्यांच्यावर होणारे हल्ले थांबले गेलेच पाहिजेत. त्यामुळे अतिशय संवेदनशील अशा या प्रसंगी बेजबाबरदारपणे वागणाऱ्यांना नागरिकांनीच धडा शिकवणं अपेक्षित आहे.