जयपूर: राफेल प्रकरणावरील लोकसभेतील चर्चेवेळी ५६ इंचाची छाती असणारा चौकीदार एका महिलेला पुढे करून स्वत: पळून गेला, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते बुधवारी जयपूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडेतोड टीका केली. त्यांनी म्हटले की, राफेल प्रकरणाच्या लोकसभेतील चर्चेवेळी ५६ इंचाची छाती असणारा चौकीदार एक मिनिटही सभागृहात आला नाही. त्याऐवजी एका महिलेला पुढे करून चौकीदार पंजाबला पळून गेला. तुम्ही माझे रक्षण करा, असे त्यांनी सितारामन यांना सांगितले. सितारामन यांनी अडीच तास लोकसभेत किल्ला लढवला. मात्र, आमच्या एका आरोपाचेही त्या धडपणे उत्तर देऊ शकल्या नाहीत. यूपीए सरकारच्या काळात आठ वर्ष राफेल करारसंदर्भात बोलणी सुरु होती. मात्र, मोदींच्या काळात थेट नवा करार करण्यात आला. मात्र, हे करताना मोदींनी संरक्षण आणि वायूदलाच्या अधिकाऱ्यांचे आक्षेप ऐकून घेतले का, असा सवाल आम्ही सितारामन यांना विचारला. मात्र, या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 




भाजपची आणि आमची विचारसरणी वेगळी असली तरी आम्ही कधीही पंतप्रधानांचा अपमान करणार नाही. परंतु, राफेल व्यवहारात मोदींनी अंबानी यांना ३० हजार कोटी रुपये मिळवून दिले असतील, तर त्याचा न्याय होणारच, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.