पंतप्रधान मोदींनी बोलवली मंत्र्यांची तातडीची बैठक
येत्या १० नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांची महत्वाची बैठक बोलावलीय. नवीन वर्षात मोदींच्या मंत्र्यांना कठीण होमवर्क देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी दिल्ली : येत्या १० नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांची महत्वाची बैठक बोलावलीय. नवीन वर्षात मोदींच्या मंत्र्यांना कठीण होमवर्क देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापुढे केवळ घोषणांच्या अंमलबजावणीवर भर देण्याच्या सूचना देण्यात येतील, असं सूत्रांनी म्हटलंय.
या बैठकीत कामकाज तपासले जाईल. बजेट मधील घोषणा आणि कॅबिनेट मधील निर्णय अंमलात आणले का, याची प्रत्येक मंत्रालयाकडून माहिती घेतली जाईल. त्याप्रमाणे संसदेचे हिवाळी अधिवेशन, अधिवेशनात ओबीसी बील संमत करून घेण्यासंदर्भात तयारी, गुजरातच्या निवडणूका या विषयीही चर्चा अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे निवडणुकांनतर मोदी सरकारमध्ये आणखी एक विस्तार होऊ शकतो त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी याच महिन्यात ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीसारखा देश हादरवणारा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवरही ही बैठक महत्वाची ठरणार आहे. नोटाबंदीबाबत आणखी काही नवीन घोषणा ते करणार का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.