नवी दिल्ली - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत. त्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभा निवडणुकीकडे असणार आहे. ही निवडणूक सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातूनच नरेंद्र मोदी भाजपसाठी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत, अशी माहिती मिळते आहे. येत्या १६ डिसेंबरला मोदी रायबरेलीमध्ये येणार आहेत. तेथील रेल्वे डब्यांच्या निर्मिती कारखान्यात तयार झालेल्या नव्या डिझाईनच्या डब्याचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी तेथूनच लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात होईल. रायबरेलीतील अन्य काही विकासकामांचे उदघाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत. एक्झिट पोल्सनुसार, ही निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या जागा गेल्या वेळच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधकांकडून भाजपला जोरदार टक्कर दिली जाण्याचे संकेत दिसत आहेत. यामुळे भाजपच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांमधील उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी लवकरच प्रचाराला सुरुवात करण्याचे पक्षाने ठरवले आहे. त्यामुळेच आतापासूनच पुढील निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात येईल. 


भाजपचे प्रवक्ते डॉ. चंद्रमोहन म्हणाले, देशातील कोणताही मतदारसंघ कोणाचीही खासगी संपत्ती नाही. गेल्या अनेक दशकांपासून रायबरेली आणि अमेठी हे दोन्ही मतदारसंघ विकासापासून वंचित आहेत. या दोन्ही मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत. याच विकासकामांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा दौरा आखण्यात आला आहे. 


रायबरेली दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी गांधी घराण्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रयागराज (अलाहाबाद) येथेही भेट देणार आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री नंदगोपाल गुप्ता यांनी एक बैठक घेऊन रायबरेलीतील विकासकामांचा आढावाही घेतला.