आता काय करायचं तुम्हीच ठरवा; मोदींनी लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवरच सोपवला
कोणाच्याही बोलण्यात निराशा नव्हती ही महत्वाची बाब आहे
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन वाढवायचा की नाही, हा निर्णय राज्यांवरच सोपवला आहे. यावेळी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना भविष्यातील खडतर आव्हानाची कल्पनाही दिली. आतापर्यंत भारताने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. मात्र, आगामी काळातही राज्यांनी आपल्या लक्ष्यापासून न ढळता सक्रियपणे काम केले पाहिजे. शहरातून गावापर्यंत कोरोना पोहोचू नये, याची काळजी घ्यायला पाहीजे. हे मोठे आव्हान आहे. लोक घराकडे निघाले आहेत हा मानवीय भाग आहे. घराकडे जाण्याची ओढ असते. लोक अडकल्यामुळे काही नियम शिथिल करावे लागले. परंतु ग्रामीण भागात कोरोना पोहोचणार नाही, याची खबरदारी घ्या, असा सल्ला मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिला.
आजच्या बैठकीत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
* पुढची रणनीती तयार करावी लागणार आहे. कोरोना पूर्व आणि कोरोना नंतरची परिस्थिती असे दोन भाग झाले आहेत
* आपण लवकर ही परिस्थिती समजावून घेणे आवश्यक आहे. आम्ही वाट नाही पाहू शकत. नवीन व्यवस्था निर्माण करावी लागेल.
* लॉकडाऊनचा प्रश्न आहे. मनोवैज्ञानिक पद्धतीने आपल्याला लढावे लागणार आहे. निश्चित उपचार दिसत नाही तोपर्यंत दो गज की दुरी पाळावी लागेल.
* रात्रीच्या संचारबंदी मुळे निश्चित मानसिक दृष्ट्या फरक पडेल, याला अधिकाधिक कडक करावे लागेल.
* पुढच्या लॉकडाऊनबाबत १५ तारखेपूर्वी आपल्याला आपल्या राज्यात कशा प्रकारे रचना करता येईल याचा आराखडा तयार करून केंद्राकडे द्या. आम्ही त्यावर विचार करून १८ तारखेपासूनच्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात समाविष्ट करूत.
* ग्रीन झोन्सला सुद्धा आपल्याला लक्ष्य द्यावे लागेल.आता मान्सून सुरु होईल. अनेक रोग येतात. अशा वेळी आपले डॉक्टर, दवाखाने सज्ज ठेवावे लागतील, नवीन संकट नको
* या बदललेल्या परिस्थितीत शिक्षांची नवी मोडेल्स विकसित करावी लागतील.
* जगातला पर्यटन व्यवसाय संकटात आहे. भारताने या परिस्थितीत आपण बारकाईने विचार करून पर्यटनाचे नवे प्रकार विकसित करावेत.
* वर्षानुवर्षे काम केले ते ठिकाण सोडून मजूर आपल्या राज्यात चालले आहेत. त्यामुळे कामगारांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. ज्या राज्यात कामगार परतले आहेत तिथल्या राज्याना देखील आव्हान असेल. राज्यांना यावर तोडगा काढावा लागेल.
* लॉकडाऊन संपवून चालणार नाही. हा एकमात्र उपाय आहे. राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार त्यात बदल करावेत.
* सर्व प्रवासी रेल्वे एकदम सुरु करू शकत नाही. काही रेल्वे सुरु केल्या आहेत , त्यात हळूहळू वाढ करण्यात येईल.
* कोणाच्याही बोलण्यात निराशा नव्हती ही महत्वाची बाब आहे.