LokSabha: निवडणुकीचं भाकित वर्तवणाऱ्या पोपटाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, मालकाला म्हणाले `पुन्हा जर याला...`
तामिळनाडूत पोलिसांनी चक्क एका पोपटावर कारवाई केली आहे. हा पोपट एखाद्या ज्योतिषीप्रमाणे लोकांचं भविष्य सांगत होता. एका नेत्याने निवडणुकीत आपलं भवितव्य काय असेल याची विचारणा केली. पण यानंतर पोपट अडचणीत आला आहे.
तामिळनाडूच्या कुड्डालोर येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी येथे चक्क एका पोपटाला अटक केली आहे. हा पोपट लोकांना त्यांचं भविष्य सांगत होता. त्याने निवडणूक लढणाऱ्या पीएमके उमेदवाराला त्याचा विजय होईल असं भाकित सांगितलं होतं. दरम्यान हा व्हिडीओ थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आणि अडचणी वाढल्या. पोलिसांनी काही वेळासाठी थेट पोपटालाच अटक केली होती. तसंच पोपटाच्या मालकाला त्याला पिंजऱ्यात कैद न ठेवण्याचा इशारा दिला.
चित्रपट दिग्दर्शक थंकर बचन पीएमके म्हणजेच पट्टाली मक्कल काची पार्टीचे उमेदवार आहेत. कुड्डालोर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. थंकर बचन रविवारी मतदारसंघात पोहोचले होते. यादरम्यान ते तेथील प्रसिद्ध मंदिराजवळ आले होते. मंदिराच्या बाहेर एक ज्योतिषी पिंजऱ्यात पोपट घेऊन बसला होता. हा पोपट समोर ठेवलेल्या कार्डमधील एक निवडत लोकांना त्यांचं भविष्य सांगत होता. थंकर यांनाही आपलं भविष्य जाणून घेण्याचा मोह आवरता आलं नाही. त्यांचे समर्थकही यावेळी त्यांच्यासह होते.
पोपटाला पिंजऱ्यात ठेवण्यात आलं होतं. त्याला बाहेर काढण्यात आलं असता त्याच्यासमोर अनेक कार्ड ठेवण्यात आले होते. त्याला या कार्डपैकी एक कार्ड निवडायचं होतं. त्याप्रमाणे त्याने एक कार्ड बाजूला केलं. या कार्डवर मंदिरातील मुख्य देवीचा फोटो होता. कार्ड पाहिल्यानंतर पोपटाच्या मालकाने तुम्हाला यश मिळेल असं जाहीर करुन टाकलं.
आपलं भविष्य ऐकल्यानंतर उमेदवाराने पोपटाला केळ खायला घातलं. हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित लोक कॅमेऱ्यात कैद करत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी पोपटाचा मालक ज्योतिषी सेल्वराज आणि भावाला काही वेळासाठी पकडलं. पोपटाला कैदेत ठेवल्याने वनविभागाने इशारा देत नंतर सुटका केली.
ज्योतिषाजवळ अजून काही पोपट सापडले आहेत. ज्यांना जंगल क्षेत्रात सोडण्यात आलं आहे. या कारवाईनंतर पीएमके नेत्यांनी डीएमके सरकारवर निशाणा साधला आहे. पीएमके अध्यक्ष डॉक्टर अंबुमणि रामदास यांनी म्हटलं आहे की, द्रमुक सरकारला आपला पराभव होईल ही गोष्ट सहन होत नसल्याने ही कारवाई केली आहे.