पाकिस्तानविरुद्धच्या `एअरस्ट्राईक`नंतर राजकीय प्रतिक्रिया...
भारतानं केलेल्या या `एअरस्ट्राईक`नंतर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेनं मंगळवारी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तान अधिकृत काश्मीर (पीओके)मध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केल्याची माहिती मिळतेय. सूत्रांच्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये भारतीय वायुसेनेच्या १२ मिराज २००० विमानांचा वापर करण्यात आला. 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवादी अड्ड्यांवर हे हल्ले करण्यात आले. पाकिस्ताननं मात्र भारताच्या लढावू विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचा दावा केलाय.
अधिक वाचा :- भारतीय वायुदलाने LOC ओलांडली, पाकिस्तानी दहशतवादी तळांचा नायनाट
भारतानं केलेल्या या 'एअरस्ट्राईक'नंतर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बातमीवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि निर्णयक्षमतेचं कौतुक केलंय. सोबतच, भारतीय वायुदलाच्या जवानांच्या शौर्याचं कौतुक करत अनेक भारतीयाच्या मनात हे होतं ते भारतीय जवानांनी करून दाखवलं... भारत हा मजबूत देश आहे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही हा संदेश यातून गेला असल्याचं म्हटलंय.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या बातमीनंतर भारतीय वायुदलाच्या जवानांचं कौतुक केलंय.
भारतीय वायुदलाच्या सैनिकांना माझा सलाम अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलीय.
तर हा स्व:संरक्षण हल्ला असून यात कोणत्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग झालेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिलीय.
'कथिररित्या बालगकोट ही ती जागा आहे जिथले 'लष्कर ए तोयबा'चा म्होरक्या हाफिज सईदनं आपले अनेक पत्ते दिलेत. भारतीय वायुसेनेनं तिथं जाऊन कोणत्याही नुकसानीशिवाय ही स्ट्राईक केलीय. हे एक यशस्वी अभियान आहे' असं ट्विट काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केलंय.
तर, 'ये मोदी का हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी... एक एक क़तरा ख़ून का हिसाब होगा! ये तो एक शुरुआत है... ये देश नहीं झुकने दूंगा...' अशी सिनेस्टाईल प्रतिक्रिया गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिलीय.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी यासंबंधीची बातमी रिट्विट करत 'ही गोष्ट खरी असेल तर हा हल्ला छोटा नसेल' अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
यातून पाकिस्ताननं धडा घेण्याची आणि दहशतवाद पसरवणं थांबवण्याची वेळ झाल्याची प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी दिलीय.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भारतीय वायुदलाच्या जवानांच्या शौर्याला सलाम केलाय.