जिनेवा : दिवसेंदिवस वायुप्रदुषणाचा विळखा वाढतच आहे. घरात आणि घराच्या बाहेर होणाऱ्या वायु प्रदूषणामुळे दरवर्षी जवळपास ७० लाख लोकांचा वेळेआधीच मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत ६ लाख लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. जवळपास ६ अब्ज लोक नियमितपणे अशा प्रदूषित हवेत श्वास घेत आहेत की यामुळे त्यांच्या जीवनाला आणि आरोग्याला मोठ्या प्रमाणावर धोका होण्याची शक्यता आहे. ही अतिशय गंभीर बाब असूनही याकडे मोठे दुर्लक्ष केले जात असल्याचे संयुक्त राष्ट्राचे विशेषज्ञ डेविड बोयड यांनी मानवाधिकार परिषेदत बोलताना सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदूषित हवेमुळे प्रत्येक तासाला ८०० जणांचा मृत्यू होत आहे. प्रदूषित हवेने अनेक वर्षांपासून असलेल्या जुन्या आजाराशी सामना करत लोकांचा मृत्यू होत आहे. कॅन्सर, श्वासासंबंधी आजार, ह्दयरोग यांसारखे अनेक आजार प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने होत आहे. स्वच्छ हवेची हमी देऊ न शकणे हे स्वच्छ पर्यावरणाच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन असल्याचे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया यूनिव्हर्सिटीत कार्यरत असणाऱ्या प्राचार्य बोयड यांनी सांगितले. या अधिकाराला १५५ देशांनी कायदेशीर मान्यता दिली असून याला जागतिक मान्यताही मिळावी असेही बोयड यांनी सांगितले.


सर्व देशांनी स्वच्छ हवा असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी पाऊले उचलायला हवीत. वायु गुणवत्ता आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या प्रभावांवर देखरेख करणे, वायू प्रदूषण स्त्रोतांचे मूल्यांकन करणे, सार्वजनिक आरोग्य सल्लामसलत तसेच इतर माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध करून दिली गेली पाहिजे असे बोयड यांनी मानवाधिकार परिषेदत बोलताना सांगितले.