कोमल वावरकर, झी मीडिया, मुंबई : उत्तर बंगालमध्ये १९९२ रोजी मोठा पूर आला होता. त्या पुरात बंगालमधील अनेक लोकांची घरं वाहून गेली. खूप नागरिकांवर तर उपासमारीची वेळ आली. याच वेळी एक शास्त्रज्ञ या लोकांच्या मदतीला देवदूताप्रमाणे धावून आले. त्यांनी बंगालमधील रिलीफ समितीच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी २५ लाख रुपये जमा केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित लोकांसाठी कपडे आणि खाद्यपदार्थाची मदत त्यांनी खूप मेहनत घेतली. रसायनशास्त्रात महान कामगिरी करणारे आचार्य प्रफुल्ल चन्द्र राय यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने, भारताची त्याकाळात जगात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. आचार्य प्रफुल्ल चन्द्र राय हे भारताचे पहिली रसायनशास्त्र संशोधन शाळाचे संस्थापक होते. राय यांना भारतात रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. 



राय यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावात झाले. ज्या शाळेत राय यांनी प्राथमिक शिक्षण घेतले, ती शाळा त्यांचे वडील चालवत असत. १० वर्षाचे असतांना राय यांना कोलकातामध्ये पाठवण्यात आले होते. कोलकात्यात ते चौथ्या वर्गात असतांना फार आजारी पडले होते. आजारपणामुळे त्यांना त्यांच्या गावाला परत जावे लागले. त्यावेळी त्यांना फार वाईट वाटलं होतं. 


मात्र त्यावेळी त्यांनी प्रेरणात्मक आत्मकथा वाचायला सुरूवात केली. सायन्स या विषयातील आर्टिकल आणि इतिहास, भूगोल, बंगाली साहित्य, सोबतच ग्रीक, फ्रेंच, संस्कृत इत्यादी भाषा ते यावेळी शिकले. त्यानंतर १८७६ रोजी राय पुन्हा एकदा कोलकात्याला परत आले. नंतर त्यांनी एल्बर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या शाळेत त्यांनी दहावीची परीक्षा चांगल्या गुणाने उतीर्ण केल्यानंतर, त्यांनी विद्यासागर महाविद्यात प्रवेश घेतला. 


या महाविद्यालयात त्यांना विज्ञान विषयांचा अभ्यास करण्याकरीता प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये जावं लागत होतं. राय यांना कलेच्या विषयात रस असून देखील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये जाताना त्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण झाली. राय यांच्यावर महाविद्यामधील अलेक्झांडर पेडलर या प्राध्यापकांचा फार प्रभाव पडला होता. पेडलर हे भारतातील सुरूवातीचे संशोधन आणि रसायनशास्त्रज्ञ होते. 


पेडलर यांचा राय यांच्यावर इतक प्रभाव पडला होता की, त्यांनी त्यांच्या वसतिगृहाच्या खोलीत एक छोटी लॅबच बनवून टाकली होती. १८८२ रोजी २१ वयाच्या वर्षी राय यांना गिलख्रिस्ट स्कॉलरशिप मिळाली. त्यांना इंग्लंडमधील एडिनबर्ग विद्यापीठात जाण्यासाठी संधी मिळाली. 


इंग्लंडमधून त्यांनी बीएससी आणि डीएससी पदवी प्राप्त केली. ज्याकाळात सेंद्रीय रसायनशास्त्र संशोधन सुरू होत होतं. त्यावेळी राय यांनी अजैविक रसायनशास्त्रात आवड दर्शविली आणि या विषयावर अनेक शोधनिबंध लिहायला सुरूवात केली. 


त्यामुळे राय यांना रसायनशास्त्र जगतात ओळखले जाऊ लागले. राय हे दुसऱ्या देशात राहून त्यांच चांगल स्वत:चे आयुष्य व्यतीत करू शकले असते. मात्र त्यांनी भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. राय यांनी जवळपास १ वर्ष त्यांच्या जवळच्या मित्राबरोबर म्हणजेच आचार्य जगदीश चंद्र बोस यांच्या बरोबर काम केलं होतं. 


१८८९ रोजी कोलकातामधील प्रेसिडेंसी महाविद्यालयात राय यांना रसायनशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमण्यात आले. या महाविद्यालयात त्यांनी रसायनशास्त्र विषयाचे संशोधन केले. त्याकाळातच तरुण वर्गाचा कल या विषयाकडे वळत होता. मेघनाद साहा आणि शांती स्वरूप भटनागर या सारखे शास्त्रज्ञ हे राय यांची देण आहेत. 


राय हे नेहमीच पुढचा विचार करत असत, म्हणून त्यांनी त्यांच्या छोट्याशा घरातून भारताच्या पहिली केमिकल फॅक्टरीचा म्हणजेच फार्मा कंपनीची स्थापना केली. त्यांनी कोलकातामध्ये केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स लिमिटेड कंपनी त्यांच्या घरी सुरू केली. 


ही कंपनी फक्त ७०० रूपयांच्या गुंतवणूकवरून सुरू झाली होती. या कंपनीतून राय यांनी त्या काळात भारतीयांच्या मनात स्वत: एक चांगला उद्योजक होण्याची भावना निर्माण केली होती. राय यांनी भारतीय तरुणांना खात्री पटवून दिली होती, इंग्रजी कंपन्यांमध्ये नोकरीची शोधाशोध करण्यापेक्षा स्वत:ची स्वदेशी कंपनी स्थापन करून चांगला उद्योग करू शकतात.  


 

भारतीय इतिहासातील पहिली कंपनी होती की, ज्यावर स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून, रसायने, औषधे आणि पावडर, टूथपेस्ट, ग्लिसरीन, साबण, कार्बोलिक साबण यासारख्या घरगुती वस्तू निर्मिती करणारी ती कंपनी होती. जेव्हा राय हे ६० वर्षाचे झाले. तेव्हा त्यांनी त्यांचे पूर्ण वेतन हे रसायनशास्त्र विभागाच्या विकासासाठी दिले होते. या मदतीने त्यांनी तिथे दोन संशोधन फेलोशिप सुद्धा सुरू केल्या होत्या.


राय यांनी अनेकवेळा आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये भारतीय विद्यापीठांचे प्रतिनिधित्व केले होते. १९२० मध्ये राय यांना भारतीय विज्ञान कॉँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. १९३६ मध्ये वयाच्या ७५ वर्षी राय प्राध्यापक पदावरून निवृत्त झाले. 


राय यांनी आयुष्यभर रसायनशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. १६ जून १९४४ रोजी म्हणजेच वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०११मध्ये रॉयल सोसाइटी ऑफ केमिस्ट्री (आरएससी) राय यांना केमिकल लँडमार्क प्लाक हा पुरस्कार देऊन सम्मानित केलं गेलं होतं. पहिल्यांदा एका नॉन-यूरोपियनला व्यक्तीला सन्मान मिळाला होता. 


हा सम्मान देताना असे म्हटलं गेलं होतं की, राय यांच्या महान कामगिरीचा हा एक छोटासा भाग आहे, आणि ही एक आनंदाची बाब आहे की, प्रथमच युरोपबाहेरील शास्त्रज्ञाला हा बहुमान प्राप्त झाला आहे.