पंतप्रधानांच्या रुपात देव भेटला; महिलेचे उदगार ऐकून मोदींना अश्रू अनावर
...आणि मोदींच्या भावनेचा बांध फुटला
मुंबई : जन औषधी दिवसानिमित्त शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी संवद साधला. यावेळी 'मी ईश्वराला पाहिलं नाही. पण, पंतप्रधान मोदी मी तुम्हाला पाहिलंय', असं म्हणत एका महिलेने पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले. हे पाहून खुद्द नरेंद्र मोदी यांनाही त्यांच्या अश्रूंचा बांध रोखता आला नाही.
अर्धांगवायूचा सामना करणाऱ्या एका महिलेला थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी आपल्याला जन औषधी परियोजनेचा लाभ कशा प्रकारे मिळाला या अनुभवाचं कथन त्या महिलेने केलं. त्यादरम्यानच 'जन औषधांमुळे माझ्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. माझ्या उपाचारांचा खर्चही कमी झाला आहे, असं त्या म्हणाल्या.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार दीपा शाह असं या महिलेचं नाव. २०११मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हा त्यांना बोलताही येत नव्हतं. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु झाला खरा. पण, औषधं फारच महाग होती. परिणामी कुटुंबाचा निर्वाहसुद्धा कठीण झाला होता. पुढे त्यांनी 'जन औषधी' (जेनेरिक)ची सुरुवात केली. ज्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला. औषधांच्या कमी झालेल्या खर्चातून त्यांनी घर चालवण्यासही सुरुवात केली.
पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत
आपल्याला पंतप्रधानांच्या प्रयत्नांतून झालेल्या याच मदतीसाठी शाह यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी मोदींची तुलना ईश्वराशी करत अतिशय निस्वार्थ: भाव त्यांनी व्यक्त केले. आपल्याप्रती देशातील नागरिकांच्या मनात असणारं हे स्थान पाहून आणि या महिलेला झालेली मदत पाहून मोदींनाही त्या क्षणी अश्रू रोखता आले नाहीत. काही क्षण शांत राहून त्यांनी अश्रू रोखण्याचा प्रयत्नही केला. पण, पंतप्रधानांचा चेहरा सारंकाही सांगून गेला.