Rahul Gandhi in Lok Sabha: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी मिळाल्यानंतर आज लोकसभेत (Lok Sabha) केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करताना त्यांची तुलना रावणाशी केली. तसंच रावणाप्रमाणे नरेंद्र मोदीही फक्त दोन लोकांचंच ऐकतात असा आरोप केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"भारत एक आवाज आहे. जर हा आवाज ऐकायचा असेल तर अहंकार, द्वेष संपवायला हवा. काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होते. पण पंतप्रधान अद्याप गेलेले नाहीत. त्यांच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूर आता वाचलेलाच नाही. आता त्याचे दोन भाग झाले असून, विभाजन झालं आहे. मी मणिपूरमधील मदत छावणीत महिलांशी, मुलांशी बोललो, जे पंतप्रधानांनी अद्याप केलेलं नाही," अशी टीका राहुल गांधींनी केली. यावेळी सत्ताधारी खासदारांचा गदारोळ सुरु होता. या गदारोळात राहुल गांधींचं भाषण सुरु होतं. 


मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे, राहुल गांधी संतापले; लोकसभेत अभुतपूर्व गदारोळ


 


"एका महिलेने मला सांगितलं की, माझा एकच मुलगा होता. माझ्या डोळ्यांसमोर त्याला गोळी घातली आहे. मी रात्रभर त्याच्या मृतदेहासह झोपली होती. नंतर मला भीती वाटू लागली. मी माझं घर आणि सगळं सोडून दिलं. तिने फक्त तिचे कपडे सोबत आणले होते. यानंतर एक फोटो काढला आणि एवढाच राहिला आहे असं सांगितलं," अशी माहिती राहुल गांधींनी दिली. राहुल गांधींनी यावेळी सत्ताधारी खासदारांना हे ऐकताना आपल्या मुलांचा विचार करा सांगितलं. 



पुढे ते म्हणाले "दुसऱ्या एका छावणीत महिला समोर आली असता मी तिला काय झालं तुमच्यासोबत असं विचारलं. मी हा प्रश्न विचारताच ती थरथर कापू लागली आणि बेशुद्ध झाली. यांनी मणिपूरममध्ये यांनी हिंदुस्थानची हत्या केली आहे. यांच्या राजकारणाने हिंदुस्थानला मारुन टाकलं आहे".


"मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. आपण देशद्रोही आहात. तुम्ही देशप्रेमी, देशभक्त अजिबात नाही. म्हणूनच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, तर हत्यारे आहात," असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला. दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी भारतमातेसंबंधी आदराने बोलावं असा सल्ला दिला. त्यावर राहुल गांधींनी आक्षेप घेतला. 



"भारतमाता माझी आई आहे. एक आई इथे बसली आहे आणि दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारलं आहे. जोवर तुम्ही हिंसा बंद करत नाही तोवर तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात. लष्कर एक दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करेल. पण तुम्ही तसं करु इच्छित नाही. जर नरेंद्र मोदी हिंदुस्थानचा आवाज ऐकत नसतील तर कोणाचा आवाज ऐकतात. ते फक्त दोन लोकांचा आवाज ऐकतात," असा आरोप राहुल गांधी यांनी केली. 


राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना रावणाशी केली. राहुल गांधी म्हणाले की, "रावण फक्त दोन कुंभकर्ण आणि मेघनाद यांचं ऐकत होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त अमित शाह आणि अदानी यांचंच ऐकतात. लंकेला हनुमानाने नाही, तर रावणाच्या अहंकाराने जाळलं होतं. प्रभू श्रीरामाने रावणाला मारलं नाही, तर त्याच्या अहंकाराने त्याला मारलं. तुम्ही संपूर्ण देशात केरोसिन फेकत आहात. मणिपूरमध्ये केरोसिन फेकलं आणि काडी ओढली. आता तुम्ही हरियाणातही तेच करत आहात. तुम्ही संपूर्ण देश जाळत आहात".