चुकीला माफी नाही; राहुल गांधींचा काँग्रेसच्या नेत्यांना इशारा
मेहनत करणाऱ्यांना योग्य ते बक्षिस मिळेल.
नवी दिल्ली: तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस पक्ष मरगळ झटकून पुन्हा नव्याने उभा राहिला आहे. मात्र, आता या घौडदौडीला कुणीही लगाम घालता कामा नये, यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत. यापुढे पक्षासाठी मेहनत करणाऱ्यांना योग्य ते इनाम मिळेल. मात्र, निरर्थक बडबड करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असा स्पष्ट संदेश राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राजस्थानमधील अशोक गेहलोत यांचे मंत्रिमंडळ निश्चित झाले आहे. त्यानुसार राजस्थानमध्ये सोमवारी २३ मंत्र्यांना शपथ दिली जाईल. या मंत्र्यांची निवड करताना राहुल गांधी यांनी जुन्या आणि नव्यांचा ताळमेळ राखायचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मंत्रिमंडळात ज्येष्ठांसोबत तरुण चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आलेय. मात्र, मंत्रिमंडळातील पाच जागा जाणीवपूर्वक रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने राहुल गांधी यांनी पक्षातील नेत्यांना स्पष्ट संदेशही देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मेहनत करणाऱ्या नेत्यांना पक्षाकडून योग्य ते इनाम मिळेल. मात्र, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल यांच्या सांगण्यावरूनच कर्नाटक मंत्रिमंडळातून काँग्रेस नेते रमेश जारकीहोली यांना डच्चू देण्यात आला होता. रमेश जारकीहोली मंत्रिमंडळाच्या आणि पक्षाच्या बैठकींना उपस्थित राहत नसत. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी असणारी जवळीक त्यांच्या गच्छंतीसाठी कारणीभूत ठरली होती.
लवकरच मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्येही मंत्रिमंडळातील चेहरे निश्चित करण्यात येतील. आगामी काही महिन्यांत काँग्रेसची कामगिरी चांगली झाल्यास पक्षाला लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे राहुल गांधी यांनी ठरवलेले धोरण डोळ्यासमोर ठेवून मंत्र्यांची निवड केली जाईल, छत्तीसगढमध्ये मंगळवारी १० मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते.