Hindenburg research : `... मग राजीनामा का दिला नाही?`, हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul gandhi On Hindenburg Report : हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपानंतर सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? असा खडा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
Hindenburg Research Report : अदानी समुहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चने आता थेट सेबीच्या प्रमुखांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आता हिंडेनबर्गने आरोप केले आहेत. अदानींच्या मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोअर फंडामध्ये माधबी पुरी बुच यांचा हिस्सा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यावर आता राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला जाब विचारला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
किरकोळ गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सेबीच्या अध्यक्षांवरील आरोपांमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झालं आहे. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? असा देशभरातील प्रामाणिक गुंतवणूकदारांचा प्रश्न आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. गुंतवणुकदारांचे कष्टाचे पैसे गमावले तर जबाबदार कोण, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सेबीचे अध्यक्ष की गौतम अदानी? असा खडा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.
समोर आलेले नवे आणि अत्यंत गंभीर आरोप पाहता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची पुन्हा स्वत:हून चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी यांनी अनेकांच्या भूवया उंचावल्या. पंतप्रधान मोदी जेपीसी चौकशीला इतके घाबरतात आणि त्यातून काय उघड होऊ शकते हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका देखील केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय नागरिक शेअर बाजारात गुंतवणूक करत आहे. आपल्याला देखील नफा होईल, या आशेने ते गुंतवणुकीकडे पाहतात. त्यांनी कष्टाने केलेली बचत शेअर बाजारात गुंतवत असतात. शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या संस्थेने तडजोड केली आहे. असे घोटाळे होत असतील तर लोकांना राग येईलच. विरोधी पक्षनेता म्हणून माझं कर्तव्य आहे की, ही बाब मी तुमच्या निदर्शनात आणून देईल, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचं अदानी ग्रुपसोबत कनेक्शन आहे. ज्या देशात कमी कर लागतो अशा देशातल्या कंपनीतून सेबीच्या प्रमुखांची कंपनी अदानी ग्रुपचे शेअर विकत घेत होती. सेबीच्या प्रमुखांची कंपनी या माध्यमातून लाखो करोडो रुपयांचा फायदा वसूल करत होती, असा आरोप हिंडर्नबर्गच्या रिपोर्टमधून करण्यात आला आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी अदानी समुहाशी संबंध असलेल्या ऑफशोअर फंडामध्ये गुंतवणूक केली होती. त्यामुळेच 2023 मध्ये हिंडेनबर्गने अदानी समुहावर प्रकाशीत केलेल्या अहवालावर त्यामुळेच सेबीने कारवाई केली नाही आणि अदानींना निर्दोष ठरवल्याचा आरोप हिंडेनबर्गने केलाय