मोदींचा फुगा तीन वर्षांतच फोडला - राहुल गांधी
मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे. आता मोदींमध्ये दम राहिलेला नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. काँग्रेसमुक्त भारत अशीच घोषणा केली होती. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोदी हे आता राहुल यांच्या निशाण्यावर राहिल्याचे दिसून येत आहे. मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे. आता मोदींमध्ये दम राहिलेला नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशातील बारांबाकी येथील रामनगर येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
मोदी हे निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्या कायमच निशाण्यावर राहिले आहेत. मात्र, आता त्यांनी उत्तर प्रदेशात आधी एकमेकांविरोधात लढणारे आज एकत्र लढत आहेत. असे सांगत राहुल गांधी यांनी मायावती आणि अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. या दोघांचा रिमोट कन्ट्रोल पंतप्रधान मोदी यांच्याकडे असल्याचे राहुल गांधी म्हणालेत.
मोदी मला घाबरतात!
मायावती आणि अखिलेश यांच्या राजकीय कारभाराचा इतिहास मोदी यांच्याकडे आहे. मात्र, माझा असा कुठलाही इतिहास नाही, त्यामुळेच मी मोदींविरोधात बोलण्यास घाबरत नाही. उलट मोदीच मला घाबरतात. मोदी माझ्यावर दबाव टाकू शकत नाहीत. मात्र, मायावती आणि अखिलेश यांना ते घाबरवू शकतात, असे राहुल म्हणालेत.
मोदी खोटे बोलतात
मोदी जिकडेही जातात खोटे बोलतात. तरुणांशी खोटे बोलतात, शेतकऱ्यांशी खोटे बोलतात. मी मात्र आपल्याला खोटे आश्वासन देणार नाही. त्यामुळे जर आमचे सरकार सत्तेत आले तर देशाच्या प्रत्येक गरीब कुटुंबाच्या खात्यात आम्ही दरवर्षी ७२ हजार रुपये टाकणार आहोत. त्याचबरोबर कर्जाची परतफेड न करु शकणाऱ्या शेतकऱ्यांनाही आम्ही तुरुंगात टाकणार नाही, असे आश्वासन यावेळी राहुल यांनी यावेळी दिले.
शेतकऱ्यांना तुरुंगात टाकणार नाही!
नीरव मोदी ३५ हजार कोटी रुपये घेऊन परदेशात पळून गेला तेव्हा त्याला तुरुंगात पाठवण्यात आले नाही, तर शेतकऱ्यांना आम्ही तुरुंगात कसे पाठवू शकतो? न्याय योजनेमुळे गरिबांना पैसे दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. गरिबांच्या खात्यात ७२ हजार रुपये गेले तर रोजगार आणि व्यावसायाच्या संधी वाढतील, असा विश्वासही यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केला.