महाराष्ट्रातील UPSC विद्यार्थ्यांची विशेष रेल्वेत हेळसांड; सीटच्या खाली झोपण्याची वेळ
रेल्वे विभागाने सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवून तब्बल १ हजार विद्यार्थ्यांना सहा डब्यांमध्ये अक्षरश: कोंबले.
रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शनिवारी रात्री विशेष रेल्वेने परत पाठवण्यात आले. त्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या प्रवासात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे विभागाने सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवून तब्बल १ हजार विद्यार्थ्यांना सहा डब्यांमध्ये अक्षरश: कोंबले. तसेच या गाडीतील शौचालयात रात्रीपासून पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
'माझा मुलगा अपंग आहे, मला बरेलीला जायचेय; माफ करा तुमची सायकल चोरतोय'
आज सकाळी विद्यार्थ्यांना नाश्ताही देण्यात आला नव्हता. डब्ब्यात प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी खाली झोपून रात्र काढली. तर एका सीटवर चार ते पाच विद्यार्थी दाटीवाटीने बसले होते. त्यामुळे रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विशेष गाड्यांमध्ये आपण सर्व सुविधा पुरवत असल्याचा दावा केला जात असला तरी हा प्रकार पाहता रेल्वे विभागाच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मजुरी करण्यासाठी आलेल्यांचा परतीचा प्रवास असा खडतर...
हे सर्वजण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या (UPSC) तयारीसाठी दिल्लीत गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे सर्वजण दिल्लीत अडकून पडले होते. गेल्या काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु होते.
काल आंबेडकर स्टेडियमवर या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर दुपारी चार वाजता त्यांच्यासाठी विशेष गाडी सोडली जाणार होती. मात्र, रेल्वेने अचानक ही गाडी रात्री आठ वाजता सोडली जाईल, असे सांगितले. एवढे करून विद्यार्थी रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतरही रेल्वे विभागाचा धसमुसळेपणा सुरुच राहिला. अखेर रात्री ११ वाजता ही विशेष रेल्वे महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाली होती.