जयपूर: लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्या स्थलांतरित कामगारांचे तांडेच्या तांडे सध्या देशातील शहरं सोडून जाताना दिसत आहेत. या मजुरांची पायपीट आणि त्यांच्यावर ओढावणाऱ्या दुर्दैवी प्रसंगांच्या अनेक कहाण्या सध्या ऐकायला मिळत आहेत. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील एका मजुराचा किस्साही असाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील राराह गावात राहणाऱ्या साहेब सिंह यांची सायकल सोमवारी रात्री चोरीला गेली. दुसऱ्या दिवशी घराच्या व्हरांड्यात त्यांना एक चिठ्ठी सापडली.
मजुरांना गावी नेणाऱ्या ट्रॉलीला अपघात, २३ जण जागीच ठार
मोहम्मद इक्बाल या स्थलांतरित मजुराने या चिठ्ठीत मी तुमची सायकल चोरली आहे, अशी कबुली दिली. मोहम्मद इक्बालला उत्तर प्रदेशमधील बरेली येथे जायचे होते. त्यासाठी त्याने सायकल चोरल्याचे सांगितले. यासाठी त्याने सायकलच्या मालकाची माफीही मागितली आहे.
मजुरी करण्यासाठी आलेल्यांचा परतीचा प्रवास असा खडतर...
मोहम्मद इक्बाल याने पत्रात म्हटले आहे की, मी मजूर आहे, मजबूर आहे. मी तुमचा गुन्हेगार आहे. तुमची सायकल घेऊन जात आहे. मला माफ करा. मला बरेलीपर्यंत जायचे आहे. माझ्याकडे कोणतेही साधन नाही आणि माझा मुलगा अपंग आहे, असे मोहम्मद याने पत्रात लिहले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये उपासमारीमुळे देशाच्या शहरी भागांतील लाखो मजुरांनी ग्रामीण भागात स्थलांतर केले आहे. या मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील १९१ श्रमिक रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून २,४५,००० कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आल्याची माहिती नुकतीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.