धुळवड खेळण्यावरुन वाद, बदडून केली एकाची हत्या
होळी आणि धुळवडीचा आनंद सर्वत्र साजरा केला जात असताना राजस्थानमधील अलवर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.
नवी दिल्ली : होळी आणि धुळवडीचा आनंद सर्वत्र साजरा केला जात असताना राजस्थानमधील अलवर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.
होळीच्या दिवशी (शुक्रवारी) एका अल्पवयीन मुलाची बदडून-बदडून हत्या करण्यात आली आहे. अलवर जिल्ह्यातील भिवाडी येथे ही घटना घडलीय.
धुळवड खेळताना झाला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक नीरज जाटव हा १७ वर्षीय तरुण दुसऱ्या समाजातील युवकांसोबत धुळवड खेळत होता. त्याच दरम्यान काही युवकांनी नीरज दलित असल्याचं म्हणत त्याला मारहाण केली आणि तेथून निघून गेले.
बदडून-बदडून हत्या
त्यानंतर सायंकाळी नीरज आपल्या मित्रांसोबत खेळत होता त्यावेळी जवळपास सहा जण काठ्या घेऊन आले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीतच नीरजचा मृत्यू झाला. तर, नीरज सोबत असलेले त्याचे मित्र संजीव आणि अजय हे जखमी झाले आहेत.
सहा जणांवर हत्येचा आरोप
अतिरिक्त पोलीस अधिक्षक पुष्पेंद्र सोलंकी यांनी सांगितले की, मृतकाच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केल्याचे निशान आढळले नाही. पोस्टमार्टम करुन मृतदेह त्याच्या घरच्यांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. तर, नीरजच्या नातेवाईकांनी सहा जाणांवर हत्येचा आरोप लावला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.